आचारसंहिता म्हणजे काय? नियम आणि कधीपासून लागू होते? जाणून घ्या सविस्तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 04:27 PM2024-10-15T16:27:19+5:302024-10-15T16:32:39+5:30

Code of conduct : आचारसंहिता म्हणजे नेमकं काय आणि त्याचे नियम आणि कायदे काय आहेत, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. त्यासंदर्भात जाणून घ्या....

What is Code of Conduct? Rules and from when? Election Commission of India,Know more... | आचारसंहिता म्हणजे काय? नियम आणि कधीपासून लागू होते? जाणून घ्या सविस्तर...

आचारसंहिता म्हणजे काय? नियम आणि कधीपासून लागू होते? जाणून घ्या सविस्तर...

Code of conduct : नवी दिल्ली :  केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ही एकाच टप्प्यात होणार आहे. संपूर्ण राज्यात एकाच दिवशी मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी केली जाणार आहे. तर झारखंडमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे. झारखंडमध्ये १३ नोव्हेंबरला पहिला टप्पा आणि २० नोव्हेंबरला निवडणुकांचा दुसरा टप्पा पार पडेल. तसेच, २३ नोव्हेंबरला झारखंडमध्ये मतमोजणी केली जाणार आहे.

दरम्यान, निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर संबंधित राज्यात आचारसंहिताही लागू झाली आहे. या काळात सरकारी यंत्रणा निवडणूक आयोगाच्या नियंत्रणाखालीच कार्य करतात. मतदान आणि मतमोजणी झाल्यानंतर अधिकृत निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता उठवली जाते. पण आदर्श आचारसंहिता म्हणजे नेमकं काय आणि त्याचे नियम आणि कायदे काय आहेत, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. त्यासंदर्भात जाणून घ्या....

काय असते आचारसंहिता?
देशात स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम बनवले आहेत. निवडणूक आयोगाच्या या नियमांना आचारसंहिता म्हणतात. लोकसभा/विधानसभा निवडणुकीदरम्यान या नियमांचे पालन करणे ही सरकार, नेते आणि राजकीय पक्षांची जबाबदारी असते.

आचारसंहिता कधीपासून लागू होते आणि किती दिवस लागू राहते?
निवडणुकीची तारीख जाहीर होताच आचारसंहिता लागू होते. देशात दर पाच वर्षांनी लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका होतात. वेगवेगळ्या राज्यांच्या विधानसभा निवडणुका वेगवेगळ्या वेळी होतात. निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करताच आचारसंहिता लागू होते. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आचारसंहितेच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असते. निवडणुकीची तारीख जाहीर होताच देशात आचारसंहिता लागू होते आणि ती मतमोजणी होईपर्यंत सुरू राहते.

आचारसंहितेचे नियम काय असतात?
निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर सरकारी पैसा कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा व्यक्तीच्या फायद्यासाठी वापरता येत नाही. याशिवाय निवडणूक प्रचारात सरकारी वाहने, बंगले, विमान किंवा सरकारी सुविधांचा वापर करता येत नाही. आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणतीही सरकारी घोषणा, पायाभरणी किंवा उद्घाटन होत नाही. याशिवाय, कोणतीही रॅली किंवा जाहीर सभा घेण्यासाठी पोलिसांची परवानगी घेणे आवश्यक आहे. निवडणूक रॅलींमध्ये पैसा, धर्म, जात यांच्या नावावर मते मागणे पूर्णपणे निषिद्ध आहे. निवडणुकीशी कोणत्याही प्रकारे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या होत नाहीत. त्यासाठी गरज भासल्यास निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागते.

एखाद्या उमेदवारानं किंवा राजकीय पक्षानं आचारसंहितेचं उल्लंघन केल्यास त्याच्यावर आयोगाच्या नियमानुसार कारवाई केली जाते. आचारसंहितेचे नियम मोडणाऱ्या संबंधित उमेदवाला निवडणूक लढवण्यास बंदी घातली जाऊ शकते. उमेदवाराने अथवा राजकीय पक्षाने नियम मोडल्यास गंभीर गोष्ट असेल तर त्या पक्षावर किंवा उमेदवारावर कायदेशीर गुन्हा दाखल केला जातो. इतकेच नव्हे तर संबंधिताला कारावासाच्या शिक्षेची तरतूदही करण्यात आली आहे. आचारसंहितेत राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांनी कशा पद्धतीने वर्तन करावे, यासंबंधीची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. 
 

Web Title: What is Code of Conduct? Rules and from when? Election Commission of India,Know more...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.