"अखेर माझा गुन्हा काय..मी प्रामाणिक नव्हतो का...?"; भाजपा नेत्याचा थेट सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 09:35 AM2024-03-05T09:35:56+5:302024-03-05T09:38:58+5:30
भाजपानं अलीकडेच १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली, त्यात राजस्थानच्या १५ उमेदवारांचा समावेश आहे. मात्र काही विद्यमान खासदारांची तिकीटही पक्षाने कापली. त्यामुळे नेत्यांमध्ये नाराजी पसरल्याचं दिसून येते.
जयपूर - लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाने १९५ जागांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत राजस्थानच्या १५ जागांचाही समावेश आहे. यावेळी भाजपानेराजस्थानच्या चुरू मतदारसंघातून विद्यमान खासदार राहुल कासवान यांचं तिकीट कापलं आहे. त्यांच्या जागी पॅरालिम्पिकमध्ये दोन वेळा सुवर्णपदक जिंकणाऱ्या देवेंद्र झाझरिया या खेळाडूला तिकीट देण्यात आले आहे. भाजपाच्या या निर्णयानंतर राहुल कासवान यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर आपली भावना व्यक्त केली.
राहुल कासवान यांनी म्हटलं की,'मी प्रामाणिक नव्हतो का? मी मेहनती नव्हतो का? मी एकनिष्ठ नव्हतो का? मी कलंकित होतो? चुरू लोकसभा मतदारसंघात काम पूर्ण करण्यात मी काही कमी पडलो का?. पंतप्रधानांच्या सर्व योजनांच्या अंमलबजावणीत मी आघाडीवर होतो. अजून काय हवे होते? मी जेव्हा जेव्हा हा प्रश्न विचारला तेव्हा सगळे अवाकच राहिले. याचे उत्तर कोणीही देऊ शकत नाही. कदाचित माझेच लोक मला काही सांगू शकतील असं त्यांनी लिहिलं. आता राहुल कासवान यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
आखिर मेरा गुनाह क्या था...?
— Rahul Kaswan (@RahulKaswanMP) March 4, 2024
क्या मैं ईमानदार नहीं था ?
क्या मैं मेहनती नहीं था ?
क्या मैं निष्ठावान नहीं था ?
क्या मैं दागदार था ?
क्या मैंने चूरू लोकसभा में काम करवाने में कोई कमी छोड़ दी थी ?
मा. प्रधानमंत्री जी की सभी योजनाओं के क्रियान्वयन में, मैं सबसे आगे था।
ओर क्या…
काँग्रेसमधून आलेल्या २ नेत्यांना उमेदवारी
भाजपाने राजस्थानमधील २५ पैकी १५ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. या यादीत माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे खासदार पुत्र दुष्यंत सिंह यांना पुन्हा तिकीट देण्यात आले आहे. दुष्यंत सिंह झालावाड-बारां मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार आहेत. या जागेवरून ते आधीच खासदार आहेत. काँग्रेसमधून पक्षांतर केलेल्या दोन नेत्यांनाही तिकीट देण्यात आले आहे. महेंद्रजीत मालवीय आणि ज्योती मिर्धा यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपात प्रवेश केला. त्यांना बांसवाडा आणि नागौरमधून तिकीट देण्यात आले आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला कोटा येथूनच निवडणूक लढवणार आहेत.
चार केंद्रीय मंत्र्यांना तिकीट
भाजपाने पहिल्या यादीत राजस्थानमधून येणाऱ्या ४ केंद्रीय मंत्र्यांनाही तिकीट दिले आहे. यापैकी केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल बिकानेरमधून निवडणूक लढवणार आहेत. याशिवाय केंद्रीय जल ऊर्जा मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांना जोधपूरमधून तर कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांना बाडमेरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री भूपेंद्र सिंह हे अलवर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. राज्यसभेच्या माध्यमातून त्यांना केंद्रात मंत्री करण्यात आले होते.