काशी-मथुरेबाबत भाजपाचा अजेंडा काय? जे.पी. नड्डांचं मोठं विधान, स्पष्ट केली पक्षाची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 09:43 AM2022-05-31T09:43:55+5:302022-05-31T09:44:43+5:30
BJP Politics News: काशी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशीद वादावर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी पहिल्यांदा जाहीर विधान केले आहे. एका प्रश्नाला उत्तर देताना जेपी नड्डा यांनी सांगितले की, भाजपाने नेहमी देशाच्या सांस्कृतिक विकासाबाबत भूमिका घेतली आहे.
नवी दिल्ली - काशी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशीद वादावर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी पहिल्यांदा जाहीर विधान केले आहे. एका प्रश्नाला उत्तर देताना जेपी नड्डा यांनी सांगितले की, भाजपाने नेहमी देशाच्या सांस्कृतिक विकासाबाबत भूमिका घेतली आहे. मात्र या प्रश्नांचं निराकरण हे कोर्ट आणि घटनेच्या माध्यमातून केलं जाईल. हे निर्णय भाजपा लागू करेल.
केंद्रात मोदी सरकारला आठ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने प्रसारमाध्यमांशी बोलताना पत्रकारांनी नड्डा यांना विचारले की, वाराणसी आणि मथुरा येथे मंदिरांना परत मिळवणे हे अजूनही भाजपाच्या अजेंड्यावर आहे? त्यावर भाजपा अध्यक्षांनी सांगितले की, भाजपाने पालमपूरमध्ये आपल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये राम जन्मभूमीच्या मुद्द्यावर एक प्रस्ताव पारित केला होता. त्यांनी सांगितले की, त्यानंतर असा कुठलाही प्रस्ताव आणण्यात आलेला नाही. सध्या वाराणसीमधील ज्ञानवापी मशीद आणि मथुरा येथील कृष्ण जन्मभूमी मंदिराशी संबंधित वादासंदर्भातील याचिकांवर खालच्या कोर्टांमध्ये सुनावणी सुरू आहे.
भाजपाध्यक्ष नड्डा यांनी सबका साथ सबका विकास नाऱ्याचा पुनरुच्चार करताना सांगितले की, पक्ष एक सशक्त राष्ट्र निर्माण करण्याच्या लक्ष्यासह प्रत्येकाला सोबत घेऊन चालू इच्छितो. सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण हा भाजपाच्या सरकारचा आत्मा आहे. नड्डा यांनी यावेळी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, धर्मेंद्र प्रधान आणि अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये एक थिम गीत सुद्धा लॉन्च केले.