Indian Railway Kavach: काय आहे भारतीय रेल्वेचं सुरक्षा ‘कवच’?; समोरासमोर येणाऱ्या वेगवान ट्रेनलाही क्षणात रोखतं
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2022 01:37 PM2022-03-05T13:37:27+5:302022-03-05T13:37:42+5:30
रेल्वेमंत्र्यांच्या उपस्थितीत कवच कार्यप्रणालीची चाचणी करण्यात आली. गुल्लागुडा ते चिटगिड्डा येणाऱ्या रेल्वे इंजिनवर स्वत: रेल्वेमंत्री हजर होते
नवी दिल्ली – रेल्वे सुरक्षेला प्राधान्य देत केंद्र सरकारनं आणि भारतीय रेल्वेने एकत्रित येत नवं तंत्रज्ञान आणत आहेत. देशात होणाऱ्या रेल्वे अपघातांना आळा बसवण्यासाठी रेल्वेची ‘कवच’ प्रणाली पुढे येत आहे. ज्याच्या मदतीनं रेल्वे अपघातावर नियंत्रण मिळवणं शक्य होणार आहे. शुक्रवारी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कवचची चाचणी घेतली. यावेळी रेल्वेचे इतर अधिकारीही उपस्थित होते.
‘कवच’मुळे समोरा-समोर येणाऱ्या ट्रेन्स आपोआप थांबतात
रेल्वेमंत्र्यांच्या उपस्थितीत कवच कार्यप्रणालीची चाचणी करण्यात आली. गुल्लागुडा ते चिटगिड्डा येणाऱ्या रेल्वे इंजिनवर स्वत: रेल्वेमंत्री हजर होते. चाचणी वेळी वेगाने येणाऱ्या ट्रेन्स एकमेकांवर आदळवण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळी वेगात असणाऱ्या ट्रेन्स आमनेसामने आल्या तेव्हा कवच प्रणालीनं काम सुरू केले. स्वयंचलित ब्रेकिंग सिस्टमचा वापर केला आणि इंजिन ३८० मीटर अंतरावर थांबवले. गेट सिग्नलजवळ येताच इंजिनची स्वयंचलित शिट्टी जोरात आणि स्पष्ट वाजली. चाचणी दरम्यान चालकाने आवाज आणि ब्रेकिंग सिस्टमला हातही लावला नाही. लूप लाइनवर इंजिन चालवताना ३० किमी प्रतितास वेग मर्यादा तपासण्यात आली. कवचने आपोआप ६० किमी प्रतितास इंजिनाचा वेग ३० किमी प्रतितास कमी करून लूप लाइनमध्ये प्रवेश केला.
काय आहे कवच?
‘कवच’ ही भारतीय उद्योगाच्या सहकार्याने रिसर्च डिझाईन अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन (RDSO) द्वारे स्वदेशी विकसित केलेली ATP प्रणाली आहे. भारतीय रेल्वेमधील ट्रेन ऑपरेशन्समध्ये सुरक्षिततेचे एकत्रित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेने चाचणी केली आहे. संपूर्ण सुरक्षा स्तर-४ मानकांसह ही एक अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक प्रणाली आहे.
धोक्याचा (Red Signal) सिग्नल ओलांडणाऱ्या गाड्यांना संरक्षण देण्यासाठी आणि टक्कर टाळण्यासाठी हे कवच काम करतं. वेगमर्यादेनुसार ड्रायव्हर ट्रेनवर नियंत्रण ठेवू शकला नाही, तर ते आपोआप ट्रेन ब्रेकिंग सिस्टम सक्रिय करते. तसेच, ते दोन इंजिनांमधील टक्कर होण्यापासून रोखते. ज्यामध्ये कवच प्रणाली कार्यरत आहे.
‘कवच’ हे १० हजार वर्षांमध्ये त्रुटीच्या संभाव्यतेसह सर्वात परवडणारे, संपूर्ण संरक्षण स्तर 4 (SIL-4) प्रमाणित तंत्रज्ञानांपैकी एक आहे. तसेच, यामुळे रेल्वेसाठी स्वदेशी तंत्रज्ञानाच्या निर्यातीचे मार्ग खुले झाले आहेत.
भारत में बना, भारत का कवच!
— Ministry of Railways (@RailMinIndia) March 4, 2022
#BharatKaKavachpic.twitter.com/12vkwgOhS0
काय आहे कवचचं वैशिष्टे?
१. रेड सिग्नल ओलांडण्यापासून रोखणे (SPAD)
२. ड्रायव्हर मशीन इंटरफेस (DMI) / लोको पायलट ऑपरेशन कम इंडिकेशन पॅनेल (LPOCIP) मध्ये दर्शविलेल्या सिग्नल पोझिशनसह ट्रेनच्या हालचालीचे सतत अपडेट
३. ओव्हर स्पीडिंग टाळण्यासाठी स्वयंचलित ब्रेकिंग
४. लेव्हल क्रॉसिंग गेट्सजवळ जाताना ऑटोमॅटिक शिट्टी वाजते
५. कार्यरत कवच प्रणालीसह सुसज्ज दोन इंजिनमधील टक्कर रोखण्यास सक्षम
६. आणीबाणीच्या परिस्थितीत SOS संदेश
७. नेटवर्क मॉनिटर सिस्टमद्वारे ट्रेनच्या वाहतुकीवर लाईव्ह निरीक्षण ठेवता येते.