48 तासांचं रहस्य काय...? तत्काळ राजीनामा न देण्यावरून भाजपचा केजरीवालांवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2024 04:14 PM2024-09-15T16:14:04+5:302024-09-15T16:14:55+5:30
केजरीवाल यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यासाठी 48 तासांचा अवधी का हवा आहे, असा सवाल भाजप केला आहे.
दिल्लीतील कथित दारू घोटाळा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर, मुख्यमंत्री केजरीवाल यांनी मोठी घोषणा केली आहे. आपण दोन दिवसांनंतर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहोत, असे केजरीवाल यांनी जाहीर केले आहे. त्यांच्या या घोषणेनंतर, त्यांनी आताच राजीनामा न दिल्यावरून भाजपने प्रश्न उपस्थित केला आहे. केजरीवाल यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यासाठी 48 तासांचा अवधी का हवा आहे, असा सवाल भाजप केला आहे.
'कशासाठी हवा आहे 48 तासांचा वेळ?' -
केजरीवाल यांनी रविवारी केलेल्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर, भाजपने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. दरम्यान भाजपने अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षावर (AAP) अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. भाजप नेते सुधांशू त्रिवेदी यांनी अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याच्या घोषणेवरून आणि राजीनामा देण्यासाठी दोन दिवसाचा वेळ, यावरून प्रश्न उपस्थित केला आहे. सुधांशू त्रिवेदी म्हणाले, केजरीवाल यांना राजीनामा देण्यासाठी 48 तासांचा वेळ का हवा आहे?
'तुरुंगातून का नाही दिला राजीनामा?' -
केजरीवाल यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर, भाजप नेते सुधांशू त्रिवेदी यांनी प्रश्न उपस्थित करत, "केजरीवाल यांनी तुरुंगात असतानाच राजीनामा का दिली नाही? की केजरीवाल यांना बाहेर येऊन काही सेटल करायचे होते? यामुळे तुरुंगातून राजीनामा देत नव्हते?
'...म्हणून केली राजीनाम्याची घोषणा' -
सुधांशू त्रिवेदी म्हणाले, आम आदमी पक्षात फुटीचे वातावरण तयार झाले आहे. हे सांभाळण्यासाठी केजरीवाल यांनी राजीनाम्याची घोषणा केली आहे. त्रिवेदी यांचे म्हणणे आहे की, आम आदमी पक्षासाठी आपल्या नेत्यांना संभाळणे अवघड होत आहे. या मजबुरीतूनच अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे.