राम मंदिर असलेल्या अयोध्येत भाजपाची काय परिस्थिती? निकाल आला, सपाचा उमेदवार जिंकला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 04:45 PM2024-06-04T16:45:56+5:302024-06-04T16:46:42+5:30
Faizabad lok sabha result 2024: उत्तर प्रदेशसह देशभरात राम मंदिरावरून वातावरण फिरविण्याची तयारी भाजपाने केली होती. त्याच उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला मोठा फटका बसला आहे.
मोदी सरकारने लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अर्धवट बांधकाम झालेल्या राम मंदिराचा जिर्णोद्धार केला होता. उत्तर प्रदेशसह देशभरात राम मंदिरावरून वातावरण फिरविण्याची तयारी भाजपाने केली होती. त्याच उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला मोठा फटका बसला आहे. सपा-काँग्रेसच्या जवळपास ४१ जागा आघाडीवर आहेत. तर भाजपा ३५ जागांवर आघाडीवर आहे. अशातच ज्या राम मंदिरवरून भाजपाने हवा केली होती त्या अयोध्येच्या लोकसभा मतदारसंघात काय झाले, याची उत्सुकता देशभरातील जनतेला लागून राहिली होती.
राम मंदिर असलेल्या अयोध्येमध्ये म्हणजेच फैजाबाद लोकसभा मतदारसंघात भाजपाचा उमेदवार सुमारे 45 हजार मतांनी पराभूत झाला आहे. या मतदारसंघात एखाद दुसरी फेरी वगळता सपाचे अवधेस प्रसाद आघाडीवर होते. भाजपाचे लल्लू सिंह काही मतांनी आघाडीवर आले होते. आता हे अंतर एवढे वाढत गेले की लल्लू सिंह यांचा पराभव निश्चित झाला आहे.
या मतदारसंघात पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मतदान झाले होते. लल्लू सिंह यांना 357414 मते मिळाली आहेत. तर अवधेश प्रसाद यांना 382267 मते मिळाली आहेत. भाजपा आणि सपा मधील उमेदवाराचे मतांचे अंतर ४५ हजार पेक्षा जास्त मतांचे झाले आहे. २०१४, २०१९ मध्ये लल्लू सिंह जिंकले होते. त्यांनाच भाजपाने पुन्हा तिकीट दिले होते.