शिक्षणाचे भगवेकरण होत असल्यास त्यात वाईट काय?; उपराष्ट्रपती नायडूंचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2022 07:51 IST2022-03-20T07:50:06+5:302022-03-20T07:51:41+5:30
आम्ही शिक्षणाचे भगवेकरण केले असा आरोप होतो. मात्र भगव्या रंगात वाईट काय, असा सवाल त्यांनी केला.

शिक्षणाचे भगवेकरण होत असल्यास त्यात वाईट काय?; उपराष्ट्रपती नायडूंचा सवाल
हरिव्दार : शिक्षणाच्या होत असलेल्या भगवेकरणाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी समर्थन केले आहे. आम्ही शिक्षणाचे भगवेकरण केले असा आरोप होतो. मात्र भगव्या रंगात वाईट काय, असा सवाल त्यांनी केला.
हरिद्वारमधील देवसंस्कृती विश्वविद्यालयात साऊथ एशियन इन्स्टिट्यूट ऑफ पीस अँड रिकन्सिलिएशन या संस्थेचे उद्घाटन उपराष्ट्रपती नायडू यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते म्हणाले की, भारतीयांनी वसाहतवादी विचारांचा त्याग केला पाहिजे. भारतीय संस्कृतीत अनेक महान परंपरा असून त्यांचा आपण अभिमान बाळगायला हवा. देशातील शिक्षणाचे भारतीयीकरण करणे हे नव्या शैक्षणिक धोरणाचे महत्त्वाचे सूत्र आहे. नायडू म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात नागरिकांनी मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धती नाकारली पाहिजे. या पद्धतीमुळे एक परकीय भाषा आपल्या शिक्षणाचे माध्यम झाली आहे. काही शतकांच्या विदेशी राजवटीमुळे आपल्यात एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण झाला आहे.
भारतीय संस्कृतीविषयी तिरस्कार निर्माण होईल अशाच पद्धतीने आपल्याला धडे दिले जातात. या सर्व गोष्टींमुळे आपल्या देशाच्या प्रगतीचा वेगही मंदावतो. (वृत्तसंस्था)
इतर भारतीय भाषाही शिका
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी सांगितले की, आपण इतर भारतीय भाषा शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या मातृभाषेवर प्रेम करायला हवे. भारतीय संस्कृतीतील चांगल्या गोष्टींचे प्राचीन संस्कृत ग्रंथांमध्ये वर्णन केले आहे. ते जाणून घेण्यासाठी संस्कृतही शिकले पाहिजे.