अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांच्या ‘करात’ काय?
By admin | Published: March 1, 2016 03:43 AM2016-03-01T03:43:55+5:302016-03-01T03:43:55+5:30
वैयक्तिक आयकराच्या स्लॅबमध्ये अर्थमंत्र्यांनी कोणताही बदल केलेला नाही. तथापि, कलम ८७ अन्वये कर सवलतीत बदल केला आहे
नवी दिल्ली : वैयक्तिक आयकराच्या स्लॅबमध्ये अर्थमंत्र्यांनी कोणताही बदल केलेला नाही. तथापि, कलम ८७ अन्वये कर सवलतीत बदल केला आहे. पाच लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या नागरिकांसाठी कर सवलतीची मर्यादा २ हजार रुपयांवरून ५ हजार झाली आहे. याचाच अर्थ करदात्यांची ३ हजार रुपयांची जास्तीची बचत होईल. ज्येष्ठ नागरिकांनाही ही करसवलत लागू
आहे. तथापि, सरसकट सर्व उत्पन्न गटांत ही सवलत लागू नाही; तसेच वयोमानपरत्वेही तरतुदींत फरक पडेल. ज्येष्ठ नागरिकांत ६0 ते ८0 वर्षे वय असलेले आणि ८0 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले असे दोन गट आहेत.
या वयोगटातील नागरिकांना ३ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही. ३ लाख ते ५ लाख उत्पन्न असलेल्या ८0 वर्षांच्या आतील ज्येष्ठांना १0 टक्के आयकर लागतो. ८७ कलमान्वये त्यांना आता ५ हजार रुपयांपर्यंत कर सवलत मिळेल. ही मर्यादा आधी २ हजार रुपये होती. याचाच अर्थ या ज्येष्ठांची ३ हजार रुपयांपर्यंत जादा बचत होईल. ५ लाख ते १0 लाख आणि १0 लाख ते १ कोटी या दोन स्लॅबमध्ये उत्पन्न असलेल्या ८0 वर्षांच्या आतील ज्येष्ठांची कोणतीही बचत होणार नाही. त्यांना नियमाप्रमाणे अनुक्रमे २0 टक्के आणि ३0 टक्के आयकर भरावा लागेल. १ कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या ८0 वर्षांच्या आतील ज्येष्ठांना अतिरिक्त ३ टक्के अधिभार द्यावा लागेल. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी हा अधिभार यंदाच्या अर्थसंकल्पात लागू केला आहे. १ कोटीपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या ज्येष्ठांना अधिभारासह ३३ टक्के आयकर लागेल.