ही कसली दारूबंदी... सकाळी विधानसभेत तर रात्री रुग्णावाहिकेत आढळली दारू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 09:26 AM2021-12-01T09:26:16+5:302021-12-01T09:26:54+5:30
विधानसभा परिसरात दारूच्या बाटल्या सापडल्याचं वृत्त कळताच तेजस्वी यादव हे पाहणीसाठी पोहोचले. त्यांनी याचा व्हिडीओदेखील ट्विटरवर शेअर केला आहे. ट्विटमध्ये त्यांनी हा प्रकार अद्भुत असल्याचं म्हटलं आहे.
पाटणा - बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी दारूबंदी (Liquor Ban) केली आहे. यामुळे तिथे मोठ्या प्रमाणावर इतर राज्यांतून नेली जाणारी दारू पकडली जाते. तसेच गावठी दारू पिऊन अनेकांचा मृत्यू होत असतो. दारूबंदीवरूनबिहारमधील वातावरण तापलेले असताना आता विरोधकांच्या हाती आयतेच कोलित सापडले आहे. विधानसभेच्या आवारात दारुच्या बाटल्या सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या बाटल्या रिकाम्या आहेत. मात्र, सकाळी विधानसभेच्या आवारात दारुच्या रिकाम्या बाटल्या सापडल्यानंतर संध्याकाळी रुग्णवाहिकेत दारुचा मोठा साठा आढळून आला आहे.
विधानसभा परिसरात दारूच्या बाटल्या सापडल्याचं वृत्त कळताच तेजस्वी यादव हे पाहणीसाठी पोहोचले. त्यांनी याचा व्हिडीओदेखील ट्विटरवर शेअर केला आहे. ट्विटमध्ये त्यांनी हा प्रकार अद्भुत असल्याचं म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या दालनापासून काही अंतरावर वेगवेगळ्या ब्रँडची दारू उपलब्ध आहे असं ट्विट त्यांनी केलं होतं. सकाळी विधानसभा आवारातील दारुची चर्चा रंगली असतानाच, रात्री सुपौल जिल्ह्यातील एका रुग्णावाहिकेतून मोठा दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. मुख्यमंत्री ग्रामपरिवहन योजनेंतर्गत चालणाऱ्या रुग्णावाहिकेतून दारुची तस्करी होत होती.
Bihar: 173 bottles of liquor found being transported in an ambulance of Mukhyamantri Gram Parivahan Yojana, in Parsarma area of Supaul. Vehicle & liquor seized by Sadar Police.
— ANI (@ANI) November 30, 2021
SHO Vinod Singh says, "We have seized 173 bottles in the ambulance, no arresting has been made so far" pic.twitter.com/GmG9PwJ9tp
जिल्ह्यातील सदर पोलीस ठाणे परीक्षेत्रातील पोलिसांनी परसरमा गावातील वार्ड 4 मधील दिपक साह यांच्या घराजवळून ही रुग्णावाहिक ताब्यात घेतली. या रुग्णवाहिकेत 173 बाटल्या विदेशी दारू होती, परसरमा गावातील चौकीदार शिवजी पासवान यांना या रुग्णावाहिकेतून दारुची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, शिवजी घटनास्थळावर रुग्णावाहिकेजवळ पोहोचले, त्यावेळी त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. त्यानंतर, काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर, पोलिसांनी रुग्णवाहिकेची झाडाझडती घेतली असताना त्यात 173 बाटल्या विदेशी दारू आढळून आली. पोलिसांनी ही रुग्णवाहिका जप्त केली असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. दरम्यान, याप्रकरणी दारुबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
राजीनाम्याची मागणी
बिहारच्या विधानसभा परिसरात आढळेल्या दारुच्या बाटल्यांवरुन माजी उपमुख्यमंत्री आणि राजदचे नेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याच दरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. येथे बाटल्या येत असतील तर ही काही सामान्य बाब नाही. हे कृत्य करणाऱ्यास सोडलं जाऊ नये. कडक कारवाई करावी" असं देखील नितीश कुमार यांनी म्हटलं आहे.