"गेल्या ७१ वर्षांत लडाखला जे नाही मिळाले, ते मोदींच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षभरात मिळाले"
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2020 12:10 PM2020-08-06T12:10:53+5:302020-08-06T12:12:28+5:30
लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाल्याचा पहिल्या वर्धापनदिनानिमित्त काल लडाखमध्ये विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
लडाख - जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणार कलम ३७० हटवून राज्याचे जम्मू काश्मीर आणि लडाख असे द्विभाजन झाल्याच्या घटनेस काल एक वर्ष पूर्ण झाले. दरम्यान, लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाल्याचा पहिल्या वर्धापनदिनानिमित्त काल लडाखमध्ये विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी भाजपा खासदार जमयांग सेरिंग नामग्याल यांनी लडाख केंद्रशासित प्रदेश बनल्याने लडाखवासियांची दीर्घकालापासूनची मागणी पूर्ण झाल्याची प्रतिक्रिया दिली. तसेच ''गेल्या ७१ वर्षांत लडाखला जे नाही मिळाले ते मोदींच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षभरात मिळाले'', असे नामग्याल यांनी सांगितले.
कलम ३७० रद्द झाल्याच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात संबोधित करताना नामग्याल म्हणाले की, हा लडाख आणि संपूर्ण देशासाठी ऐतिहासिक दिवस आहे. कलम ३७० आणि कलम ३५ अ रद्द करून जम्मू काश्मीर पुनर्गठन कायद्यांतर्गत राज्याचे जम्मू काश्मीर आणि लडाख अशा दोन केंद्रशासित भागात विभाजन झाले. लडाखला केंद्रशासित प्रदेश बनवल्याने येथील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी पू्र्ण झाली आहे.
गेल्या वर्षभरात विद्यापीठ, वैद्यकीय महाविद्यालय, हॉटेल मॅनेजमेंट इंस्टिट्युट यांची स्थापना करून लडाखने विकासाच्याबाबतीत बरेच टप्पे गाठले आहेत. सललेल्या आणि चालू आर्थिक वर्षात विशेष आर्थिक पॅकेज म्हणून लडाखला ११ हजार कोटी रुपये मिळाले आहेत. तसेच मिशन ऑर्गेनिक डेव्हलपमेंट इंटेंटिव्ह अंतर्गत लेहसाठी २५० आणि कारगिलसाठी २५० कोटी रुपये मिळाले आहेत. लडाखला गेल्या ७१ वर्षांत जे काही मिळाले नव्हते, ते गेल्या वर्षभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली मिळाले, असेही नामग्याल म्हणाले.