तिसरी लाट थोपविण्यासाठी कोणते उपाय करणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 06:16 AM2021-05-07T06:16:46+5:302021-05-07T06:16:54+5:30
सुप्रीम काेर्टाने केंद्राकडून मागविला तपशील
नवी दिल्ली : देशात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्यावेळी लहान मुलांनासुद्धा मोठ्या प्रमाणावर संसर्ग होऊ शकतो. हे लक्षात घेता तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी काय पूर्वतयारी केली आहे, याचा तपशील केंद्र सरकारने सादर करावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
लहान मुलांपासून सर्वच वयोगटातील लोकांचे लसीकरण अधिक संख्येने व्हावे, यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली पाहिजेत, असेही न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश धनंजय चंद्रचूड व न्या. एम.आर. शहा यांनी सांगितले की, कोरोनाची तिसरी लाट येणार असे गृहीत धरून तिचा मुकाबला करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला लस देण्याकरिता आतापासूनच शास्त्रीय पद्धतीने नियोजन करावे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
दिल्लीला ७०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा केल्यास त्याचा अन्य राज्यांच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो, असे सर्वोच्च न्यायालयाचे सॉलिसिटर जनरल तुषार म्हणाले.
कधी येणार तिसरी लाट?
देशात कोरोनाची तिसरी लाट हिवाळ्यात म्हणजे नोव्हेंबरच्या अखेरीस किंवा डिसेंबरच्या प्रारंभी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशातील जास्तीत जास्त लोकांचे दिवाळीपूर्वी लसीकरण होणे आवश्यक आहे. तिसऱ्या लाटेत युवकांना मोठ्या प्रमाणावर कोरोनाची बाधा होण्याची शक्यता आहे.
- डॉ. गिरीश बाबू, साथरोगतज्ज्ञ, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, बंगळुरू
लहान मुलांना लस देण्याची योजना आखा
n तिसऱ्या लाटेत कोरोनाबाधित झालेलं लहान मूल जेव्हा उपचारासाठी रुग्णालयात जाईल, तेव्हा त्याच्या आईवडिलांनाही त्याच्यासोबत जावे लागेल.
n लहान मुलांनाही लस देण्यासंदर्भात आता केंद्र सरकारने योजना आखायला हवी. त्याची पूर्वतयारी आतापासूनच केली तर भविष्यात कोरोनाशी अधिक प्रभावीपणे मुकाबला करता येईल.