संमेलन शुं छे? संमेलननगरीतच विद्यार्थी अनभिज्ञ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 03:46 AM2018-02-16T03:46:12+5:302018-02-16T03:46:21+5:30
९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाविषयी साहित्य वर्तुळात उत्साहाचे वातावरण आहे. त्यातच ८३ वर्षांनंतर बडोद्याला पुन्हा साहित्य संमेलनाचे यजमानपद मिळाले आहे.
बडोदा साहित्यनगरी : ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाविषयी साहित्य वर्तुळात उत्साहाचे वातावरण आहे. त्यातच ८३ वर्षांनंतर बडोद्याला पुन्हा साहित्य संमेलनाचे यजमानपद मिळाले आहे. मात्र, बडोदा येथील साहित्यनगरी अशी ओळख असणाºया महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठातील विद्यार्थीच या मराठी साहित्य संमेलनापासून अनभिज्ञ असल्याचे दिसून येते आहे. शिवाय, बडोदेकरही या साहित्य संमेलनाच्या सोहळ्याबाबत उदासीन असल्याचे चित्र आहे.
बडोद्यामध्ये महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या कारकीर्दीत १९०९, १९२१ आणि १९३४ अशी तीन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर २०१८मध्ये पुन्हा एकदा या साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान बडोदेकरांना मिळाला आहे. मात्र, खुद्द संमेलननगरी असा थाट मिरवणाºया महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठातील विद्यार्थ्यांना इतका भव्य सोहळा या नगरीत होत आहे, याची तसूभरही कल्पना नाही. याउलट, विद्यापीठातील स्थानिक महोत्सवामध्ये हे विद्यार्थी दंग झालेले दिसून आले. मुख्य म्हणजे, बडोदा स्थानक येथे उतरल्यापासून संमेलननगरी या मार्गात संमेलनाविषयीचे एकही होर्डिंग लावण्यात आलेले नाही.
संमेलन सोहळ्याविषयी विद्यापीठातील विद्यार्थी दिव्यांग शाह याला विचारले असता तो म्हणाला की, ‘संमेलन शुं छे? इस बारे कुछ पता नही, पर हमारा डान्स का प्रोग्राम है; वो बढिया शुरू है। मराठी संमेलन के बारे मे हमे प्राध्यापकोने भी नही बताया।’ विद्यार्थी मौनी जुमेदार हिला विचारले असता, ‘संमेलन असा शब्द फक्त कानावर पडला. मात्र, हे संमेलन कसले, कशासाठी, कोणी आयोजित केले, याबाबत काहीच माहिती नाही.’
आयोजक अपयशी
साहित्य संमेलननगरीत म्हणजेच विद्यापीठाच्या आवारात काही कार्यक्रम आयोजित होणाºया ठरावीक जागा सोडल्या, तर कुठेही संमेलनाचा उत्साह दिसून येत नाही. शिवाय, विद्यापीठ असो वा आयोजक, दोघेही साहित्य संमेलन तरुणाईपर्यंत पोहोचविण्यात अपयशी ठरल्याचे दिसून येते.