"२५० दहशतवादी ठार झाल्याच्या शहांच्या दाव्यावर मोदी गप्प का?"
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 04:37 AM2019-03-06T04:37:22+5:302019-03-06T04:38:24+5:30
हवाई दलाने केलेल्या हल्ल्यात २५० दहशतवादी ठार झाल्याच्या भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी केलेल्या दाव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मौन का धारण केले आहे, असा सवाल बसपाच्या प्रमुख मायावती यांनी केला आहे.
लखनऊ : पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये हवाई दलाने केलेल्या हल्ल्यात २५० दहशतवादी ठार झाल्याच्या भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी केलेल्या दाव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मौन का धारण केले आहे, असा सवाल बसपाच्या प्रमुख मायावती यांनी केला आहे.
मायावती यांनी टिष्ट्वटमध्ये म्हटले की, बालाकोटमधील बळींबाबत शहा यांनी केलेल्या वक्तव्याबाबत त्यांचे गुरू व प्रत्येक गोष्टींचे श्रेय घेण्यासाठी उतावीळ असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन धारण केले. दहशतवादी मारले जाणे ही चांगलीच बातमी आहे. पण असे असूनही पंतप्रधान त्याबाबत काहीच बोलत नाही यामागचे नेमके गुपित तरी काय आहे? पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. त्यामागे पाकिस्तानचा हात आहे असे ठोस पुरावे मिळाल्यानंतर त्या देशातील बालाकोट येथे असलेले जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी तळ भारताने उद््ध्वस्त केले होते.
गरीब, शेतकरी वंचित
मायावतींनी म्हटले आहे की, १३० कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात आर्थिक विकासाचे लाभ गरीब, शेतकरी, मजूर यांना कधीच मिळत नाहीत ही चिंतेची बाब आहे. कृषी व उत्पादनक्षेत्रात मंदी आली असून त्यामुळे जीडीपी ६.६ टक्क्यांपर्यंत खाली घसरला. याचे उत्तर सातत्याने जुमलेबाजी करणाऱ्या सरकारकडे आहे का असा प्रश्नही त्यांनी केला.