जनसेवेसाठी धर्मांतर करण्याची गरज काय?
By admin | Published: March 24, 2015 02:14 AM2015-03-24T02:14:43+5:302015-03-24T02:14:43+5:30
अल्पसंख्यकांच्या संपूर्ण संरक्षणाची ग्वाही देत केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी सोमवारी धर्मांतरविरोधी कायद्याची गरज व्यक्त केली.
नवी दिल्ली : अल्पसंख्यकांच्या संपूर्ण संरक्षणाची ग्वाही देत केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी सोमवारी धर्मांतरविरोधी कायद्याची गरज व्यक्त केली. धर्मांतर कार्यक्रमात सहभागी झाल्याशिवाय लोकांची सेवा करता येणार नाही का, असा सवालही त्यांनी केला.
राज्य अल्पसंख्यक आयोगाच्या संमेलनात राजनाथ बोलत होते. ‘घर वापसी’ आणि धर्मांतराबाबत कधी कधी अफवा पसरतात व वाद निर्माण होतात. कुठल्याही प्रकारच्या धर्मांतराची गरजच काय? सेवा करायची असेल तर त्यांचा धर्म न बदलताही ती केली जाऊ शकते. लोकांनी त्यांचा धर्म बदलावा, म्हणून सेवा केली जाते का? धर्मांतराचा मुद्दा संसदेतही उपस्थित झाला होता. सरकारने या मुद्यावर काहीतरी करावे, असे विचार अनेकांनी मांडले होते; मात्र माझ्या मते, यात समाजाचीही भूमिका आहे. परस्परांच्या श्रद्धेचा आदर करून आपण जगू शकत नाही का, असे अनेक सवाल राजनाथसिंग यांनी यावेळी केले.
संघ परिवाराने धर्मांतराच्या मुद्यावर ख्रिश्चनांवर हल्ले चालवले असताना, राजनाथसिंग यांचे हे वक्तव्य आले आहे. मदर टेरेसांच्या सेवाभावी कार्यामागे धर्मांतराचा उद्देश असल्याची टीका अलीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केली होती. त्यांच्या या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)
४लखनौ/जयपूर : केंद्रातील भाजपप्रणीत रालोआ सरकार सत्तेवर आल्यानंतर देशातील सांप्रदायिक वातावरण बिघडले आहे. मुस्लिमच नव्हे, तर ख्रिश्चनही या वातावरणात स्वत:ला असुरक्षित समजू लागले आहेत, अशा आशयाचा ठराव आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने रविवारी पारित केला.
४देशातील मुस्लिमांची सर्वोच्च संस्था असलेल्या आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या १२४ व्या अधिवेशनात हा ठराव पारित करण्यात आला. देशातील हिंदुत्ववादी शक्ती ‘विष’ ओकत आहेत. केवळ मुस्लिमच नाहीत, तर ख्रिश्चनही स्वत:ला असुरक्षित समजत आहेत, असे या ठरावात म्हटले आहे. बोर्डाचे सह महासचिव मोहंमद अब्दुल रहीम कुरैशी यांनी याबाबत माहिती दिली.
४मी सर्व राज्य सरकारांना अल्पसंख्यकांच्या संरक्षणासाठी यथाशक्ती ठोस पावले उचलण्याची विनंती करतो. मी व माझे सरकार अल्पसंख्यकांच्या रक्षणासाठी कटिबद्ध आहोत. परमेश्वराच्या शपथेपूर्वक मी हे सांगू इच्छितो, अशी ग्वाही राजनाथसिंग यांनी यावेळी दिली.