सब गोलमाल है... नीरव मोदीनं घोटाळ्याच्या एवढ्याss पैशाचं काय केलं बघा!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2018 01:36 PM2018-03-28T13:36:24+5:302018-03-28T13:40:21+5:30
पंजाब नॅशनल बँकेकडून कर्ज घेतल्यानंतर नीरव मोदीने हे पैसे तब्बल 1000 खात्यांमध्ये विभागून ट्रान्सफर केले.
मुंबई: पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) तब्बल 11300 कोटींचा चुना लावून पसार झालेल्या नीरव मोदी याचे लंडनमधील एका बँकेत गुप्त खाते असल्याची माहिती समोर आले आहे. लंडनच्या बारलेक्स पीएलसी बँकेतील या खात्याची माहिती भारतीय आयकर विभागाला मिळाली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, नीरव मोदीच्या या खात्यात जवळपास 9 कोटी रूपये आहेत. मोदी लिमिटेड फर्मच्या नावे हे खाते आहे. मात्र, नीरव मोदी याचा वैयक्तिक खात्यासारखा उपयोग करायचा. सध्या भारतीय यंत्रणांकडून नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या परदेशातील बँक खात्यांची जोरदार तपासणी सुरू आहे. या तपासातून नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेकडून कर्ज स्वरूपात घेतलेल्या पैशांचा माग काढण्यात यश आले आहे.
पंजाब नॅशनल बँकेकडून कर्ज घेतल्यानंतर नीरव मोदीने हे पैसे तब्बल 1000 खात्यांमध्ये विभागून ट्रान्सफर केले. त्यासाठी बनावट कंपन्यांच्या नावे खाती तयार करण्यात आली होती. यासंदर्भात सध्या भारतीय यंत्रणा अनेक हवाला ऑपरेटर्सवर नजर ठेवून आहे. या ऑपरेटर्सच्या माध्यमातून नीरव मोदीने हा पैसा देशाबाहेर नेल्याची शक्यता आहे. आयकर विभागाने आत्तापर्यंत नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या 15 देशांतील बँक खात्यांची तपासणी केली आहे.
नीरव मोदीने एलओय़ूच्या माध्यमातून पंजाब नॅशनल बँकेकडून कोट्यवधींचे कर्ज घेतले होते. सुरूवातीला हा घोटाळा 11500 कोटींची असल्याचे सांगितले जात होते. त्यानंतर ही रक्कम 12700 कोटींवर पोहोचली होती. यानंतर सक्तवुसली संचलनालयाकडून (ईडी) नीरव मोदीच्या भारतातील मालमत्ता आणि संपत्ती जप्त करण्यात आली होती.