पीएफमधून कोणत्या कारणांसाठी रक्कम काढता येते? किती काढता येते? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 04:44 AM2021-04-19T04:44:01+5:302021-04-19T04:44:37+5:30
epfo money withdrawal: ‘भविष्य निर्वाह निधी’ अर्थात ‘पीएफ’ हा निवृत्तीनंतर सर्वात सुरक्षित आणि महत्त्वाचा आधार असताे. वेतनातून १२ टक्के निधी हा कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात जमा करण्यात येताे. त्यावर व्याजही चांगले मिळते.
लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : ‘भविष्य निर्वाह निधी’ अर्थात ‘पीएफ’ हा निवृत्तीनंतर सर्वात सुरक्षित आणि महत्त्वाचा आधार असताे. वेतनातून १२ टक्के निधी हा कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात जमा करण्यात येताे. त्यावर व्याजही चांगले मिळते. मात्र, अनेकदा पीएफमधून पैसे काढण्याची गरज भासते. त्यासाठी काही नियम असून, नमूद केलेल्या कारणांसाठीच त्यातून पैसे काढता येतात. त्याबद्दल जाणून घेऊ या.
‘ईपीएफओ’ सदस्यांना काही प्रमाणात निधी काढण्याची मुभा आहे. गृहकर्जाची परतफेड, नवीन घर खरेदी किंवा घराची दुरुस्ती, वैद्यकीय गरज, अपत्यांचा विवाह, नाेकरी जाणे, अशा काही कारणांसाठी निधी काढता येताे. नाेकरी गेल्यास ७५ टक्के निधी काढता येताे. त्यासाठी नाेकरी गेल्यानंतर एक महिना प्रतीक्षा करावी लागते, तसेच आणखी महिनाभर नाेकरी न मिळाल्यास उर्वरित २५ टक्के रक्कम काढण्यास परवानगी आहे.
मुलांच्या लग्नासाठी
मुलांच्या लग्नासाठी ५० टक्के रक्कम काढण्यास परवानगी आहे. स्वत:चे याेगदान, तसेच त्यावरील व्याजाच्या ५० टक्के रकमेचा यात समावेश आहे. मात्र, त्यासाठी ‘ईपीएफ’ खाते किमान ७ वर्षे जुने असले पाहिजे.
गृहखरेदीसाठी मिळू शकते ९० टक्के रक्कम
गृहखरेदीसाठी ‘ईपीएफ’ खात्यातून ९० टक्के रक्कम काढता येते. घराचे नूतनीकरण किंवा दुरुस्तीसाठीदेखील ९० टक्के रक्कम काढता येते. घर खरेदीसाठी यापूर्वी गृहकर्ज काढले असेल तरीही गृहकर्जाच्या परतफेडीसाठी ९० टक्के रक्कम काढता येते.