रेल्वे अपघातात जखमींनी भरपाईसाठी काय करावे? 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 07:52 AM2023-06-06T07:52:22+5:302023-06-06T07:57:53+5:30

अपघातात झालेल्या नुकसानीमुळे प्रवाशांना भरपाई देता यावी, यासाठी रेल्वेने नियमांमध्ये वेळोवेळी बदल केले आहेत.

what should the injured in a train accident do for compensation | रेल्वे अपघातात जखमींनी भरपाईसाठी काय करावे? 

रेल्वे अपघातात जखमींनी भरपाईसाठी काय करावे? 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क: ओडिशाच्या बालासोर येथे शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातातील मृतांची संख्या २८८ च्या पुढे गेली आहे. तर ११,३४० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. पंतप्रधान कार्यालयाने मृत्यू झालेल्यांच्या नातेवाइकांना २ लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाखांची आर्थिक मदत देण्याची घोषणा रेल्वे मंत्रालयाने केली आहे. अपघातात झालेल्या नुकसानीमुळे प्रवाशांना भरपाई देता यावी, यासाठी रेल्वेने नियमांमध्ये वेळोवेळी बदल केले आहेत.

अपघात कशाला समजावे? 

- याची माहिती रेल्वे कायदा १९८९ च्या १३ व्या प्रकरणात दिली आहे. ट्रेनमध्ये काम करताना अपघात, प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांमधील टक्कर किंवा प्रवाशांना घेऊन जाणारी ट्रेन रुळावरून घसरल्यास याला अपघात समजून जखमींना भरपाई दिली जाते. 

- यात नमूद आहे की, अपघातामुळे एखाद्या प्रवाशाचा मृत्यू झाल्यास आणि गंभीर शारीरिक इजा झाल्यास रेल्वे विभाग जबाबदार राहील.

कुणाला किती मदत? 

अपघातात एखाद्याची दृष्टी गेली किंवा श्रवणशक्ती कमी झाली किंवा चेहरा विद्रूप झाला, तर ८ लाखांची भरपाई दिली जाते. दुखापतीच्या तीव्रतेनुसार जखमी प्रवाशाला ३२ हजार ते ८ लाख रुपयांपर्यंतची भरपाई दिली जाते.

या प्रकरणात भरपाई नाही 

आत्महत्येचा प्रयत्न, त्यात झालेली इजा, बेकायदा कृत्याने झालेली दुखापत, अस्वस्थ मनाने कृत्य करून इजा पोहोचविल्यास या बाबी अपघात म्हणून ग्राह्य धरल्या जात नाहीत. यात नुकसानभरपाई दिली जात नाही.

भरपाईसाठी काय करावे लागते?

- पीडित व्यक्ती किंवा मृत व्यक्तीचे कुटुंबीय भरपाईसाठी रेल्वे दावा न्यायाधिकरणाकडे (आरसीटी) अर्ज करू शकतात.

- अपघात किंवा अनुचित घटनेत मृत किंवा जखमी व्यक्तीची माहिती लगेच आरसीटीला कळवावी. 

- भरपाईसाठी दावे सादर केल्यावर त्यांची चौकशी होते. 

- आरसीटीकडून नोटीस मिळाल्यापासून १५ दिवसांत या प्रकरणांमध्ये रेल्वेला लेखी निवेदन द्यावे लागते. 

- दाव्याच्या रकमेच्या मंजुरीनंतर १५ दिवसांच्या आत जारी केलेल्या किंवा पाठवलेल्या धनादेशाच्या तपशिलाची पुष्टी केली जाते. 

- मुख्य हक्क अधिकाऱ्यांना ८ लाख रुपयांपर्यंतच्या अपघाती नुकसानभरपाईचे दावे निकाली काढण्याचे अधिकार आहेत.

- अर्जदाराचे राहण्याचे ठिकाण, तिकीट खरेदी केलेले ठिकाण, अपघात किंवा अनुचित घटना घडलेली जागा आदी तपशील अर्जात नमूद करावा. 

- आरसीटीसमोर दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी २१ दिवसांच्या आत पूर्ण करणे आवश्यक असते. 

- सविस्तर माहितीसाठी  www.indianrailways.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी. विविध स्वरूपाचे अर्ज येथून डाऊनलोड करता येतात.

 

Web Title: what should the injured in a train accident do for compensation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.