वस्तूंचा पुरवठा म्हणजे काय?

By Admin | Published: January 18, 2017 01:05 AM2017-01-18T01:05:50+5:302017-01-18T01:05:50+5:30

येणाऱ्या वस्तू व सेवाकराबाबत कर भरण्यासाठी वस्तू आणि सेवा यांचा ‘पुरवठा’ (सप्लाय) हा एकमेव निकष पुरेसा ठरणार आहे.

What is the supply of goods? | वस्तूंचा पुरवठा म्हणजे काय?

वस्तूंचा पुरवठा म्हणजे काय?

googlenewsNext


-अ‍ॅड. विद्याधर आपटे
येणाऱ्या वस्तू व सेवाकराबाबत कर भरण्यासाठी वस्तू आणि सेवा यांचा ‘पुरवठा’ (सप्लाय) हा एकमेव निकष पुरेसा ठरणार आहे. विक्री, हस्तांतर, अदलाबदल, विनिमय, हक्क, भाडेतत्त्व आणि विनियोग या सर्व व्यवहारांचा समावेश ‘सप्लाय’ मध्येच होणार आहे. काही ठोकताळे मात्र तेच आहेत, जसे की-
१. वस्तू अथवा सेवेचा पुरवठा पैसे अथवा इतर कुठलाही मोबदला घेऊन केलेला असावा. २. पुरवठा व्यावसायिक उद्देशाने केलेला असावा. ३. पुरवठा करपात्र क्षेत्रातून झालेला असावा. ४. पुरवठा करपात्र असावा आणि ५. करपात्र असलेला पुरवठा हा करपात्र व्यक्तीने केलेला असावा.
वस्तू किंवा मालाचा पुरवठा आणि सेवेचा पुरवठा यात नक्की कशाचा समावेश होणार? आणि यासाठी काही ठोकताळे आहेत का? यासाठी खालील तरतुदी विचारात घ्याव्या लागतील. या लेखात केवळ वस्तूच्या पुरवठ्याचा विचार करू यात.
१. वस्तूच्या मालकीचे हस्तांतरण. २. मालकी हस्तांतरित न करता केवळ वस्तूचे किंवा वस्तूचे हक्क किंवा वस्तूचे समभाग न होणारा हिस्सा याचे हस्तांतरण. ३. विशिष्ट कराराद्वारे ज्यात वस्तूच्या मोबदल्यात मिळणारी पूर्ण रक्कम मिळाल्यानंतर वस्तूची मालकी हस्तांतरण केली जाईल असा उल्लेख आहे. ४. जर व्यवसायातील काही भांडवली वस्तूंची (कॅपिटल गुड) विक्री अशा व्यक्तीने केली असेल, जिला करपात्र व्यक्तीकडून कर्जवसुलीचा अधिकार दिला गेलाय. त्या वेळीही हा व्यवसायिक कारणाने केलेला पुरवठा धरला जाईल. ५. करपात्र व्यक्तीने व्यवसाय बंद करावयाचे ठरवल्यास वा आपल्याकडील भांडवली वस्तू-व्यवसाय पूर्णत: बंद करून, दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला (त्यांच्याशी संलग्न) व्यवसायासकट चालवायचे ठरवल्यास हा भांडवली वस्तूचा पुरवठा आहे, असे धरले जाईल. ६.एखाद्या संस्थेने, क्लबने, कंपनीने सभासदांना पैशाच्या किंवा अन्य किमतीच्या मोबदल्यात वस्तूंचा केलेला पुरवठा.
थोडक्यात, वस्तूंबाबत उत्पादन, विक्री वापरायला देणे असे आणि अशा प्रकारचे सर्व व्यवहार ‘पुरवठा’ या सदरात मोडतात. वस्तू आणि अदृष्य असलेल्या सेवा यांचा वेगवेगळा अथवा एकत्रित पुरवठा, यासाठी मापदंड वेगवेगळाच ठेवावा लागणार आहे. पुढील लेखात सेवेचा पुरवठा कशा-कशाला म्हणायचे ते बघू.

Web Title: What is the supply of goods?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.