मोदींच्या हेलिकॉप्टरमधून उतरलेल्या ट्रंकचे काय आहे गौडबंगाल?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 04:41 AM2019-04-15T04:41:07+5:302019-04-15T04:43:00+5:30

लोकसभा निवडणकीच्या धामुधुमीत कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरमधून उतरवण्यात आलेल्या एका काळ्या रंगाच्या ट्रंकने संशय निर्माण केला

What is the trunk of Modi's helicopter? | मोदींच्या हेलिकॉप्टरमधून उतरलेल्या ट्रंकचे काय आहे गौडबंगाल?

मोदींच्या हेलिकॉप्टरमधून उतरलेल्या ट्रंकचे काय आहे गौडबंगाल?

Next

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरमधून उतरवण्यात आलेल्या एका काळ्या रंगाच्या ट्रंकने संशय निर्माण केला असून सर्वच राजकीय पक्षांनी या प्रकाराकडे लक्ष वेधून घेतले आहे. हे काय गौडबंगाल आहे, त्याची चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसने केली असून पंतप्रधानांनी यावर खुलासा करावा, असे आवाहनही केले आहे. यावर अन्य राजकीय पक्षांनीही प्रश्न उपस्थित केले आहेत.
काँग्रेस प्रवक्ते आनंद शर्मा यांनी यासंदर्भात चौकशीची मागणी केली असून कर्नाटक काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे शनिवारी तक्रारही दाखल केली आहे. काँग्रेसने शुक्रवारीच या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रसारित केला आहे. या व्हिडिओमध्ये दोन माणसे एक काळ्या रंगाची ट्रंक हेलिकॉप्टरमधून उतरवत असून पंतप्रधानांच्या ताफ्यामधून बाजूला असलेल्या एका खासगी गाडीतून ती दूर नेत असल्याचे दिसत आहे.
युवा काँग्रेसचे नेते श्रीवास्तव यांनी ट्वीट केले असून ही संशयित काळी ट्रंक पंतप्रधानांच्या हेलिकॉप्टरमधून कशी काय उतरविली आणि वाट पहात थांबलेल्या ताफ्यामधून कशी काय वेगाने दूर नेली, असा प्रश्न उपस्थित केला आहे. ही ट्रंक पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेचा भाग कशी काय बनली नाही, असाही सवाल त्यांनी केला.


काँग्रेस नेते आनंद शर्मा म्हणाले, मोदी चित्रदुर्ग येथे हेलिकॉप्टरने पोहोचले. त्यांच्यासोबत एक काळी ट्रंकही होती, जी नंतर एका खासगी गाडीमधून ती नेण्यात आली. ती गाडी पंतप्रधानांच्या ताफ्याचा भाग नव्हता. ती ट्रंक नंतर कोठे नेण्यात आली, ती गाडी कोणाची होती, त्या ट्रंकमध्ये नेमके काय होते असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. त्यात रोख रक्कम नसेल तर त्याची तत्काळ चौकशी केली गेली पाहिजे. पंतप्रधानांच्या हेलिकॉप्टरमध्ये नेमके काय नेले जाते, याची माहिती जनतेपर्यंत पोहोचलीच पाहिजे. आयोगाने या प्रकाराची चौकशी करेल, अशी अपेक्षा असून सत्य बाहेर यावे, अशी अपेक्षा आहे.
शर्मा म्हणाले, या ताफ्यात आणखीही तीन हेलिकॉप्टर होते. पंतप्रधान ज्यातून आले, ते चित्रदुर्ग येथे उतरल्यानंतर त्यातील ती काळी गूढ ट्रंक दूर नेली. यामागचे गौडबंगाल काय आहे? मोदींनी पारदर्शकता दाखवावी आणि त्यात काय होते याचा खुलासा करावा. (वृत्तसंस्था)
> व्हिडीओ व्हायरल
कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष दिनेश गुंडू राव यांनी शनिवारी हा १५ मिनिटांचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल केला. राव यांनी हा व्हिडिओ कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनाही रिट्विट केला. संयुक्त जनता दलानेही चौकशीची मागणी केली. दिवसातून तीनवेळा मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या वाहनांची तपासणी अधिकारी करतात, मग पंतप्रधानांच्या ताफ्याची का चौकशी करत नाहीत, असा सवाल त्यांनी केला आहे.

Web Title: What is the trunk of Modi's helicopter?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.