Modi@4 : पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यांतून भारताला नेमकं काय मिळालं?; हा आहे लेखाजोखा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2018 11:11 AM2018-05-26T11:11:18+5:302018-05-26T11:11:18+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध देशांच्या संसदेतही भाषणे केली आहेत.
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाप्रणित रालोआ २ सरकारला सत्तेत येऊन आता चार वर्षे झाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरुवातीच्या काही काळापासून सतत परदेश दौरे करणारे नेते म्हणूण ओळखले जातात. मात्र त्यांच्या या दौऱ्यांमुळे भारताचे शेजारील व इतर काही महत्त्वांच्या देशांशी संबंध दृढ झाले आहेत. भारताचा सांस्कृतिक प्रभाव जगभरात प्रसारित होण्यासाठीही त्याचा फायदा झाला आहे.
पाकिस्तान वगळता गेल्या चार वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष दौरे करुन विविध करार व समस्या तडीस लावल्या आहेत. अफगाणिस्तानात भारतातर्फे बांधण्यात आलेल्या संसद इमारतीचे उद्घाटन करुन त्यांनी परत येताना पाकिस्तानला धावती भेट दिली खरी पण त्यावर टीकाच जास्त झाली. परराष्ट्र संबंध असे धावत्या अचानक भेटीने सुधारत नाहीत अशी प्रतिक्रिया त्या भेटीवर उमटली होती.
पण भूतानच्या संसदेत भाषण, नेपाळमधील विविध प्रकल्पांची पायाभरणी यामुळे आपल्या हिमालयातील मित्रदेशांशी मोदी यांनी संबंध वाढवले. गेली चाळीस वर्षे भारत आणि बांगलादेश यांच्यामधील रखडलेला भूसीमा करार मोदी यांच्या कार्यकाळात पूर्ण केला गेला हे शेजारील देशांच्या बाबतीतील मोठे यश म्हणावे लागेल. म्यानमार सीमेत घुसून भारतीय दलांनी केलेल्या अचानक कारवाईमुळे व सर्जिकल स्ट्राइकमुळे भारत दहशतवादी व फुटिरतावादी यांना सोडणार नाही असे चित्र त्यांना निर्माण करता आले.
इस्रायलशी भारताचे संबंध गेली ७० वर्षे आहेत व मुत्सद्दी पातळीवर संबंध प्रस्थापित होऊन २६ वर्षे झाली आहेत. मात्र भारताने याबाबत फारशी खुली भूमिका ठेवली नव्हती. वाजपेयी यांच्या काळात इस्रायलचे तत्कालीन पंतप्रधान अरायल शेरॉन यांनी भेट देऊन संबंधाचा पाया रचला होता. त्यावर नरेंद्र मोदी व बेंजामिन नेतान्याहू यांनी दोन्ही देशांच्या मैत्रीला पुढे नेण्याचे काम केले. दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या देशांना भेट दिली आणि विविध करारांवर स्वाक्षर्याही केल्या.
भारताच्या इस्रायलच्या वाढत्या मैत्रीने एक नवा पेच तयार झाला तो म्हणजे पँलेस्टाइन संबंधात आलेला अडथळा. नरेंद्र मोदी यांनी इस्रायलभेटीवर असताना पॅलेस्टाइनला जाणे टाळल्याने टीकाकारांचे सूर अधिकच तीव्र झाले. मात्र मोदी यांनी पॅलेस्टाइनचा स्वतंत्र दौरा करुन या शंकाकुशंका दूर केल्या व भारताने पॅलेस्टाइनची उपेक्षा केलेली नाही हे सिद्ध केले. या पँलेस्टाइन दौर्यात मोदी यांनी जॉर्डन व ओमान दौराही केला. चीनमध्ये केलेल्या सलग दौऱ्यांमध्ये व चीनचे अध्यक्ष शी. जिनपिंग यांच्या भारतभेटींमुळे दोन्ही देशांतील तणावपूर्व वातावरणाही चर्चेचा पर्याय खुला राहिला.
ब्रिटीश आणि अमेरिकन खासदारांसमोरील भाषणाांबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऑस्ट्रेलिया, अफागाणिस्तान, भूतान, माॅरिशस अशा देशांच्या संसदेत भाषण करण्याती संधी मिळाली. कदाचित अशी अनेक संसदसभांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळवणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान असावेत. याबरोबरच पंतप्रधान मोदी यांनी सुरुवातीपासूनच प्रत्येक देशामध्ये गेल्यावर तेथिल भारतीय समुदायाशी संवाद सुरु ठेवला. कदाचित त्याचा त्यांच्या प्रतिमा संवर्धनासाठी फायदा झाला असावा. पंतप्रधान मोदी यांनी माॅरिशस, सेशेल्स अशा चिमुकल्या पण राजकीयदृष्ट्या महत्व असणाऱ्या शांनाही भेट दिली.