विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 07:30 PM2024-09-30T19:30:22+5:302024-09-30T19:31:26+5:30
IC 814 Kandahar hijack: नुकत्याच ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या ‘IC ८१४ द कंधार हायजॅक’ या वेबसिरीजमुळे १९९९ साली झालेल्या या विमान अपहरणकांडाची नव्याने चर्चा सुरू झाली आहे. त्यावेळी प्रवाशांच्या सुटकेसाठी तडजोडी करण्यासाठी गेलेले तत्कालीन परराष्ट्रमंत्री जसवंत सिंह यांच्यासोबत असलेल्या लाल सुटकेसवरूनही अनेक तर्कवितर्क लढवले गेले होते.
नुकत्याच ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या ‘IC ८१४ द कंधार हायजॅक’ या वेबसिरीजमुळे १९९९ साली झालेल्या या विमान अपहरणकांडाची नव्याने चर्चा सुरू झाली आहे. त्यावेळी प्रवाशांच्या सुटकेसाठी तडजोडी करण्यासाठी गेलेले तत्कालीन परराष्ट्रमंत्री जसवंत सिंह यांच्यासोबत असलेल्या लाल सुटकेसवरूनही अनेक तर्कवितर्क लढवले गेले होते. दरम्यान, मानवेंद्र सिंह यांनी ते अपहरणकांड आणि जसवंत सिंह यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
मानवेंद्र सिंह यांनी सांगितले की, आयसी ८१४ या अपहरण झालेल्या प्रवासी विमानाला अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सोडवण्यासाठी भारताच्या एका विमानानं हवेत उड्डाण केलं होतं. त्यामध्ये एनएसजी कमांडो तैनात होते. जर दुबईने परवानगी दिली असती तर भारताने तिथेच कारवाई केली असती. मात्र दुबईकडून तशी परवानगी मिळाली नाही. मात्र भारताने अपहरणकर्त्यांवर आणलेला दबाव काही प्रमाणात उपयोगाला आला. तसेच विमानात इंधन भरण्याच्या मोबदल्यात महिला आणि मुलांना विमानातून उतरवण्यात आलं. तसेच एका मृत पॅसेंजरचा मृतदेहही विमानातून बाहेर काढण्यात आला.
दरम्यान, विमान अपहरणकर्त्यांशी वाटाघाटी करण्यासाठी भारत सरकारच्यावतीने गेलेल्या जसवंत सिंह यांच्यासोबत असलेल्या एका लाल सुटकेसबाबतही मानवेंद्र सिंह यांनी मोठा गौप्यस्फोट केला. त्यांनी सांगितले की, अपहरणकर्त्यांनी केलेल्या मागण्यांबाबत सरकारकडून काही पर्याय शोधण्यात येत होते. काही तोडगा निघेल का? याची चाचपणी करण्यात येत होती. पैशांच्या देवाणघेवामीचा विषय नव्हता. तसेच लाल सुटकेस नेण्यासारखंही काही घडलं नव्हतं. एका राज्यसभा खासदारांने अशा प्रकारच्या चर्चा सुरू केल्या होत्या. तेव्हापासूनच लाल सुटकेसवरून टीका केली जात आहे. मी स्वत: माझ्या वडिलांना सोडण्यासाठी विमानतळावर गेलो होते. ते एक ब्रिफकेस नेहमी स्वत:जवळ बाळगायचे. त्यामध्ये पूजेचं साहित्य आणि माळा असायची. मात्र ती ब्रिफकेससुद्धा त्यांनी त्या दिवशी नेली नव्हती. आता बोलणारे काहीही बोलतील, असं ते म्हणाले.
मानवेंद्र सिंह यांनी पुढे सांगितलं की, विमानाच्या अपहरणानंतर जेव्हा दहशतवादी विमान कंधारला घेऊन गेले तेव्हा दहशतद्यांच्या सुटकेसोबत वाटाघाटी करण्यासाठी एखाद्या कॅबिनेट मंत्र्यांनेही यावं, म्हणून बोलावणं आलं होतं. त्यावेळी अशी जबाबदारी घेण्यास कुणीही तयार नव्हतं. अखेरीस परराष्ट्रमंत्री या नात्याने जसवंत सिंह यांनी ही जबाबदारी योग्यरीत्या पार पाडली. हाच धर्म होता, असे ते म्हणाले.