इतकी कसली घाई होती? निधनाच्या निराधार बातम्यांवर सुमित्रा महाजनांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 11:40 AM2021-04-23T11:40:44+5:302021-04-23T11:41:39+5:30
शशी थरूर यांनी काल रात्री उशिरा केलं महाजन यांच्या निधनाचं ट्विट
भोपाळ: काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांनी काल रात्री उशिरा लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचं निधन झाल्याची माहिती ट्विटरवरून दिली. थरूर यांनी महाजन यांना श्रद्धांजली वाहिली. मात्र त्यानंतर थोड्याच वेळात महाजन यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती समोर आली. निधनाबद्दलचं निराधार वृत्त देणाऱ्या थरूर आणि माध्यमांबद्दल महाजन यांनी नाराजी व्यक्त केली.
मला माझ्या खात्रीलायक सुत्रांकडून सुमित्रा महाजन यांच्या निधनाची माहिती मिळाल्याचा दावा थरूर यांनी केला. याबद्दल महाजन यांनी नाराजी बोलून दाखवली. 'माझ्या पुतणीनं थरूर यांच्या माहितीचं ट्विटरवर खंडन केलं. रण कोणतीही खातरजमा न करता अशा प्रकारे निधनाची घोषणा करण्याची काय गरज होती? इतकी कसली घाई होती?,' असे प्रश्न महाजन यांनी उपस्थित केले. प्रशासनाशी संपर्क न साधता, कोणतीही खातरजमा न करता निधनाचं वृत्त देणाऱ्या माध्यमांबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.
How could news channels run a report on my so called demise without even cross checking with the Indore administration? My niece refuted Mr. Tharoor on Twitter but what was the urgency in announcing without confirmation?: Sumitra Mahajan, former Lok Sabha speaker (File photo) pic.twitter.com/eE6mv15rly
— ANI (@ANI) April 23, 2021
'वृत्तवाहिन्या कोणत्याही प्रकारची खातरजमा, पडताळणी न करता निधनाचं वृत्त कसं काय देऊ शकतात? माझ्या पुतणीनं शशी थरूर यांनी दिलेल्या माहितीचा ट्विटरवर इन्कार केला. पण कोणत्याही पडताळणीशिवाय अशी माहिती देण्याची कसली घाई होती?' असा सवाल महाजन यांनी विचारला.