अमेरिकेने इराणबरोबरचा करार मागे घेतल्यामुळे भारतावर काय परिणाम होईल?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2018 05:48 PM2018-05-09T17:48:48+5:302018-05-09T17:48:48+5:30
तेल आयातीत सध्या अडथळा येणार नसला तरी तेलाचे दर मात्र वाढण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.
नवी दिल्ली- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी बराक ओबामा यांच्या प्रशासनाने इराणशी केलेल्या कराराला रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच इराणवर नवी बंधनेही लादण्यात आली आहेत. ट्रम्प यांच्या या निर्णायाचा भारतासह इतर अनेक देशांवर परिणाम होणार आहे. भारत आणि इराण यांचे संबंध सध्या वेगाने सुधारत आहेत. पायाभूत सुविधांसह दोन्ही देशांमध्ये विविध विषयांवर करार झाले आहेत. इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी फेब्रुवारी महिन्यामध्ये भारताला भेट दिली होती. त्यामुळे अमेरिकेने जरी इराणवर बंधने लादली असली आणि इतर देशांना इराणपासून लांब राहाण्याचे संकेत दिले असले तरी भारत व इराण यांच्या संबंधांमध्ये फारसा तणाव येणार नाही.
भारताने चाबहार बंदराच्या विकासासाठी 50 कोटी डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे निश्चित केले आहे. चाबहार हे मध्यपुर्वेत अत्य़ंत महत्त्वाच्या ठिकाणी आहे. तसेच भारताला व्यापारामध्ये या बंदरामुळे मोठा फायदा होणार आहे. चाबहारमधील गुंतवणूक अमेरिकेचे लक्ष वेधून घेऊ शकते. चाबहारप्रमाणे दुसरा सर्वात काळजीचा मुद्दा आहे तो तेलाचा. भारत हा तेलाचा वापर करणारा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. तर सौदी अरेबिया आणि इराक यांच्यानंतर भारताला कच्चे तेल पुरवणाऱ्या देशांमध्ये इराण आघाडीवर आहे. भारत इराणकडून कच्चे तेल खरेदी करण्यासाठी युरोपियन बँकामार्फत युरोचा वापर करत आहे जोपर्यंत ते थांबवले जात नाही तोपर्यंत इराणकडून मिळणाऱ्या तेल आयातीत अडथळा येणार नाही.
तेल आयातीत सध्या अडथळा येणार नसला तरी तेलाचे दर मात्र वाढण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. अमेरिकेने करार रद्द करण्यापुर्वीच जागतिक बँकेने तेलाच्या दरात 20 टक्क्यांनी वाढ होईल असे भाकित वर्तवले होते. तसेच व्हेनेझुएलाच्या तेल उत्पादनात घट झाल्यामुळे आणि तेथिल राजकीय, आर्थिक अस्थिरतेमुळे तेल महागले होते. आता तेलाचे दर आणखी वाढल्यास भारताच्या जीडीपी आणि रुपयावर परिणाम होईल आणि चलनवाढीचा दरही वाढण्याची शक्यता आहे.
India has to walk the tightrope in the US-Iran spat. Immediate concern will be possible disruption in oil supply from Iran-third largest source for crude after Iraq and Saudi Arabia—and delay in developing Chabahar port.
— Nitin A. Gokhale (@nitingokhale) https://twitter.com/nitingokhale/status/994047886789939201?ref_src=twsrc%5Etfw">May 9, 2018