बारावीच्या निकालाचे निकष काय असणार?; पालक, विद्यार्थ्यांची वाढली धाकधूक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 08:46 AM2021-06-04T08:46:12+5:302021-06-04T08:47:12+5:30
अंतिम निकाल हा अंतर्गत गुणांच्या आधारे जाहीर होणार असला तरी त्याचे नेमके निकष काय असतील, हे अजून स्पष्ट नसल्याने पालक, विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली आहे.
मुंबई : बारावीची परीक्षा रद्द झाल्याने राज्य मंडळाच्या १४ लाख विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अंतिम निकाल हा अंतर्गत गुणांच्या आधारे जाहीर होणार असला तरी त्याचे नेमके निकष काय असतील, हे अजून स्पष्ट नसल्याने पालक, विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली आहे.
अकरावीच्या विद्यार्थ्यांप्रमाणे सीईटी द्यावी लागेल का, ती ऐच्छिक असेल का, विशेष म्हणजे ती आम्हाला ज्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे त्याची असेल की ज्या विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे त्या विद्यापीठाची असेल, असे प्रश्न बारावी वाणिज्य शाखेच्या आणि गोखले महाविद्यालयाची विद्यार्थिनी असलेल्या प्रेरणा कळंबे हिने उपस्थित केले.
परीक्षाच होणार नसल्याने फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या विषयांत चांगले गुण मिळविण्याची संधी नाही आणि अंतर्गत मूल्यमापन कोणत्या निकषांवर होणार हे अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे चिंता वाटत असल्याचे अभियांत्रिकीला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या शौमिकने सांगितले.
जेव्हा आम्ही अकरावी आणि बारावीच्या वर्षात अंतर्गत परीक्षा किंवा अंतर्गत मूल्यमापनासाठी गृहपाठ, व्यवसाय दिले तेव्हा आम्हाला कल्पना नव्हती की या परीक्षांचे गुण थेट आमच्या पदवी प्रवेशासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. या कारणास्तव अंतर्गत मूल्यमापनाचे निकष काय असणार याबद्दल उत्सुकता असल्याचे मत कला शाखेच्या महेश निरंजनने व्यक्त केले.
पदवी प्रवेशासाठी राज्यातील विद्यापीठांत आणि नामांकित महाविद्यालयांत सीबीएसई, आयसीएसई आणि राज्य मंडळ विद्यार्थ्यांमध्ये विशेष चढाओढ
असते. त्यामुळे बारावीच्या परीक्षा रद्द केल्याने पुढील पदवीचे प्रथम वर्ष प्रवेशासाठी गुण समानीकरण कसे करणार आणि प्रवेशाची प्रक्रिया कशी राबविणार, याकडेही विद्यार्थ्यांचे लक्ष आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची गुणवत्ता आणि यंदाच्या वर्षाची मेहनत यांची सांगड घातली जाईल असा फॉर्म्युला ठरवून त्यावरच पदवी प्रवेशाची प्रक्रिया राबवावी. सीईटी परीक्षांचा विविध शाखा आणि विविध अभ्यासक्रमांसाठीचा घाट घातल्यास गुंता वाढेल, असे पालकांनी सांगितले.