कशी असेल करुणानिधी आणि जयललिता यांच्या पश्चात तामिळ राजकारणाची दिशा?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2018 11:15 AM2018-08-08T11:15:59+5:302018-08-08T11:17:24+5:30
गेल्या काही दशकांमध्ये तामिळी अस्मितेच्या राजकारणाबरोबर इतर अनेक विषयही जोडले गेले आहेत. जयललिता आणि करुणानिधी यांच्या निधनानंतर या राजकारणाची दिशा कशी असेल हे पाहाणे आवश्यक आहे.
चेन्नई- द्राविडी चळवळीतील अत्यंत महत्त्वाचे नेते असणाऱ्या करुणानिधी यांनी काल संध्याकाळी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने गेली सलग सहा दशके तामिळ राजकारणाची दिशा ठरवणारा एक अग्रगण्य नेताच तामिळनाडूने गमावला आहे. गेल्या काही दशकांमध्ये तामिळी अस्मितेच्या राजकारणाबरोबर कावेरी पाणीवाटप, श्रीलंकेत तमिळ मच्छिमारांना अटक होणे, दुष्काळ असे इतर अनेक विषयही जोडले गेले आहेत. जयललिता आणि करुणानिधी यांच्या निधनानंतर या राजकारणाची दिशा कशी असेल हे पाहाणे आवश्यक आहे.
तामिळनाडूच्या या विधानसभेचे वैशिष्ट्य म्हणजे या विधानसभेच्या कार्यकाळातच द्रमुक आणि अण्णाद्रमुक पक्षाचे नेते म्हणजे करुणानिधी आणि जयललिता यांचे निधन झाले. नेते गेल्यामुळे संबंधित पक्षांमध्ये एकप्रकारची पोकळीही निर्माण झाली आहे. त्यातच 2014 च्या लोकसभा निवडणूकीत भाजपाने पी. राधाकृष्णन यांच्यारुपाने तामिळनाडूतील एक लोकसभेची जागा मिळवली आहे. अभिनेता रजनीकांत यांनी राजकारणात केलेला प्रवेश तसेच कमल हसन यांनी राजकीयदृष्ट्या कार्यरत होणे द्रमुक, अण्णाद्रमुकला चिंता करायला लावणारे आहे.
करुणानिधी यांच्यानंतर द्रमुक पक्षाचे नेते म्हणून स्टॅलिन यांच्याकडे पाहिले जाते. मात्र गेल्या चार वर्षांमध्ये राजकीय पातळीवर द्रमुकला एकापाठोपाठ एक धक्के सहन करावे लागले आहेत. 2014मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या पक्षाचा दारुण पराभव झाला. 2016च्या विधानसभा निवडणुकीतही जयललिता यांच्या अण्णाद्रमुक पक्षाने द्रमुकला मोठा धक्का देत सत्तेमध्ये प्रवेश केला. जयललिता यांच्या निधनानंतर आर. के. नगर येथे झालेल्या पोटनिवडणुकीत द्रमुकच्या उमेदवाराचे डिपॉझिटही जप्त झाले.
जयललिता यांच्या पश्चात शशिकला यांना मुख्यमंत्रीपद मिळण्याऐवजी कारागृहात जावे लागले. तर मुख्यमंत्रीपद पलानीस्वामी यांच्याकडे आले. सुरुवातीचा गोंधळाचा काळ सोडल्यास अण्णाद्रमुकने आपले पाय पुन्हा रोवायला सुरुवात केली आहे. आर. के नगर च्या पोटनिवडणुकीमध्ये टीटीव्ही दिनकरन यांच्यारुपाने एक लोकप्रिय नेताही अण्णाद्रमुकला मिळाला. तसेच अण्णाद्रमुकने केंद्रातील भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील सरकारशीही जुळवून घ्यायला सुरुवात केली आहे. अर्थात टीटीव्ही दिनकरन आणि पलानीस्वामी, ओ.पी. पनीरसेल्वन यांच्यामध्ये मतभेद झाल्यास अण्णाद्रमुकमध्येही बेबनाव होऊ शकतो.
स्टॅलिन यांचे भाऊ अळगिरी हे करुणानिधींच्या हयातीतच नेतृत्वाला आव्हाने देत होते. स्वतंत्र निर्णय घेण्याच्या स्वभावाने अळगिरी यांनी करुणानिधींची नाराजीही ओढावून घेतली. आता करुणानिधींच्या पश्चात ते कोणती भूमिका घेतात हे पाहावे लागेल. तर स्टॅलिन यांची बहिण कनिमोळी, माजी केंद्रीय मंत्री ए. राजा व दयानिधी मारन हे दुसऱ्या फळीतील नेते स्टॅलिन यांना आव्हान देतील अशी स्थिती नाही. राज्यात स्टॅलिन आणि केंद्रात कनिमोळी अशी राजकारणाची स्वच्छ विभागणी झाल्याचे येथे दिसते.