VIDEO- काय होणार पद्मावतचं? सिनेमाहॉलमधील तिकिट काऊंटरला आग, गुजरातमध्ये मल्टीप्लेक्सची माघार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2018 08:57 PM2018-01-20T20:57:33+5:302018-01-20T21:06:23+5:30
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'पद्मावत' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जसजशी जवळ येतेय तसतसे या चित्रपटाविरोधातील वातावरणही तापू लागले आहे.
नवी दिल्ली - संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'पद्मावत' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जसजशी जवळ येतेय तसतसे या चित्रपटाविरोधातील वातावरणही तापू लागले आहे. हरीयाणातील फरीदाबादमधील बल्लभगड येथील एका सिनेमाहॉलचे तिकिट काऊंटर करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी पेटवून दिल्याची घटना घडली आहे. तोंडाला कपडा बांधून आलेल्या युवकांनी हा हल्ला केला व त्याचे चित्रीकरण केले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
वादामुळे पद्मावती हे मूळ नाव बदलून चित्रपटाचे पद्मावत नाव करण्यात आले. पण तरीही वाद शमलेला नाही. भन्साळींनी ऐतिहासिक तथ्याची मोडतोड केल्याचा आरोप करणी सेनेकडून करण्यात येतोय. भन्साळी, चित्रपटातील कलाकारांना धमकी देणा-या करणी सेनेने आता सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनाही धमकी दिली आहे. जयपूर लिटरेचर फेस्टीव्हलसाठी प्रसून जोशींना जयपूरमध्ये पाय ठेऊ देणार नाही अशी धमकीच करणी सेनेने दिली आहे.
राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि हरीयाणा या राज्यातील चित्रपटाच्या प्रदर्शनावर घातलेल्या बंदीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे पण हा सर्व वाद पाहता गुजरातमधील मल्टीप्लेक्स असोशिएशनने हा चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे.