पाकिस्तानच्या ताब्यातील वैमानिकाचे काय होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 06:14 AM2019-02-28T06:14:01+5:302019-02-28T06:14:27+5:30

पळ काढणाऱ्या विमानाचा पाठलाग करताना भारताचे मिग-२१ लढाऊ विमान बुधवारी (ता. २७) कोसळले.

What will happen to a Pakistan custody pilot? | पाकिस्तानच्या ताब्यातील वैमानिकाचे काय होणार?

पाकिस्तानच्या ताब्यातील वैमानिकाचे काय होणार?

Next

पळ काढणाऱ्या विमानाचा पाठलाग करताना भारताचे मिग-२१ लढाऊ विमान बुधवारी (ता. २७) कोसळले. तत्पूर्वी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान पॅराशूटच्या साहाय्याने बाहेर पडण्यात यशस्वी झाले. जखमी अवस्थेतील वर्धमान यांना पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतले. त्यांचे काय होणार, या संदर्भात एयर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले यांनी केलेले शंका समाधान...

पाकिस्तानच्या ताब्यातील भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान सुखरूप भारतात परततील का?
भूषण गोखले : जिनिव्हा करारानुसार पाकिस्तानला वर्धमान यांना सोडावेच लागेल.


जिनिव्हा करार काय आहे?
एयर मार्शल (नि.) भूषण गोखले - या आंतरराष्ट्रीय करारानुसार शत्रू राष्ट्राच्या ताब्यात आलेले सैनिक अथवा नागरिकांना यातना देणे, शारीरिक इजा पोहोचविणे, मानवाधिकार नाकारणे आदींना प्रतिबंध घालण्यात आला आहे. भारतीय वैमानिक ताब्यात घेतल्याचे स्वत: पाकिस्ताननेच उघड केले आहे. तो जिवंत आहे आणि त्याची शारीरिक अवस्थाही चांगली असल्याचे जगासमोर आले आहे. त्यामुळे वर्धमान याच्यासोबत पाकिस्तानला आगळीक करता येणार नाही. जिनिव्हा कराराचा भंग केल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची प्रतिमा आणखी काळवंडेल, जे त्यांना अजिबात परवडणारे नाही.

या कराराची अंमलबजावणी कशी होईल?
भूषण गोखले : शत्रू राष्ट्राच्या सैनिकांना-वैमानिकांना मायदेशी पाठविण्याचे बंधन पाकिस्तानवर आहे. नियमानुसार आपण तातडीने आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस संघटनेकडे याची माहिती दिलेली आहे. दिल्लीतल्या पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांना केंद्र सरकारने तातडीने पाचारण केले होते. त्यांच्याकडे हीच अधिकृत मागणी केलेली असणार. जिनिव्हा कराराचे उल्लंघन करण्याचे धारिष्ट्य पाकिस्तान सद्यस्थितीत दाखविण्याची शक्यता नाही. फक्त सध्याच्या तणावग्रस्त वातावरणात वर्धमानला ते केव्हा सोडतील, हे सांगणे अवघड आहे.


वर्धमानकडून पाकिस्तानला काही माहिती काढून घेता येईल का?
भूषण गोखले - पाकिस्तानी सैन्याने जाहीर केलेल्या व्हिडीओत वर्धमान यांची देहबोली सकारात्मक आणि विश्वासपूर्ण वाटली. ते आत्मविश्वासाने बोलत होते. त्यांनी कोणतीही माहिती पाकिस्तानला दिलेली दिसत नाही. शत्रूच्या ताब्यात सापडल्यानंतर कसे वागायचे, काय बोलायचे, दुर्गम भागात-जंगलात जिवंत कसे राहायचे, शत्रूच्या तुरुंगात तग कशी धरायची, शत्रूकडून दिल्या जाणाºया यातना कशा सोसायच्या आदींचे प्रशिक्षण वैमानिक-सैनिकांना दिलेले असते.


वर्धमान पाकिस्तानच्या ताब्यात सापडल्याने हवाई हल्ल्याचे महत्त्व कमी झाले का?
भूषण गोखले : वर्धमानचे पॅराशूट पाच किलोमीटर अलीकडे आले असते, तर हा प्रसंग उद्भवला नसता. सैनिक-वैमानिक शत्रूच्या ताब्यात जाण्याच्या घटना अपेक्षित असतात. यामुळे हवाई हल्ल्याचे यश कमी होत नाही. या दोन्ही घटनांचा संबंध जोडणे चुकीचे आहे.

Web Title: What will happen to a Pakistan custody pilot?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.