पुतळे पाडून काय होणार ?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2018 04:37 PM2018-03-06T16:37:44+5:302018-03-06T16:37:44+5:30

भाजपावाल्यांनी त्रिपुरामध्ये विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर त्या राज्यातील दक्षिण भागात ब्लादिमिर लेनिनचे दोन पुतळे उद््ध्वस्त केले असा आरोप होत आहे. त्यातील एक पुतळा त्रिपुरातील बेलोनिया व दुसरा पुतळा सब्रुम भागात होता.

What will happen to the statue? | पुतळे पाडून काय होणार ?

पुतळे पाडून काय होणार ?

Next

- समीर परांजपे

भाजपावाल्यांनी त्रिपुरामध्ये विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर त्या राज्यातील दक्षिण भागात ब्लादिमिर लेनिनचे दोन पुतळे उद््ध्वस्त केले असा आरोप होत आहे. त्यातील एक पुतळा त्रिपुरातील बेलोनिया व दुसरा पुतळा सब्रुम भागात होता. त्रिपुरा विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर काही दिवसांतच हे प्रकार घडले आहेत. या घटनांमुळे काही वर्षांपूर्वी ऐकलेल्या एका व्याख्यानाची आठवण झाली. इंटरनेट काय, जागतिकीकरण ही संकल्पनाही अस्तित्वात यायची होती अशा काळात लोकमान्य टिळक यांना लेनिन आणि लिंकन आपापल्या देशात करत असलेल्या कार्याची व त्यांच्या विचारांची स्पष्ट कल्पना होती. त्याचवेळी, कामगारांमध्ये टिळकांविषयी असलेल्या प्रीतीबद्दल लेनिन यांनाही कुतूहल होते. आपली राष्ट्रीय चळवळ पुढे नेताना जागतिक बदलांची नोंद आपण सतत घेतली पाहिजे, याचे एक वैश्विक भान लोकमान्यांना होते. लोकमान्यांच्या या पैलूवर चर्चा करण्यासाठी पार्ले टिळक विद्यालयात ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

लिंकन, लेनिन आणि लोकमान्य - आदर्शवादाचा जागतिक संघर्ष या विषयावर हे व्याख्यान होते. लेनिन व सावरकरांचाही संपर्क झाला होता. लोकमान्य टिळक व सावरकर हे हिंदुत्ववादी होते. त्यांना लेनिनचे वावडे नव्हते कारण त्याचे विचार त्यांना समजून घ्यायचे होते. भाजपवाल्यांचा लेनिनच्या पुतळ्यापेक्षा त्याचे विचार आदर्श आहेत, असे भासवत त्रिपुराचे तीन-तेरा वाजविणा-या साम्यवाद्यांवर रोष असावा. मात्र त्यासाठी लेनिनचा पुतळा पाडणे हा मूर्खपणा आहे. महापुरुषांच्या विचारांचा त्यांचे अनुयायीच पराभव करतात ते डाव्यांनी देशात करून दाखविले आहे. मात्र त्यांच्या गैरगोष्टींसाठी लेनिन किंवा अन्य महापुरुषांच्या पुतळ्यांवर राग काढणे ही बमियानमधे तालिबान्यांनी गौतम बुद्धाच्या शिल्पांचा जो विध्वंस केला त्याचीच री ओढण्यासारखे आहे. युक्रेनमध्ये २०१३-२०१४ या कालावधीत खारकिव्ह शहरामध्ये लेनिनचा एक अतिभव्य पुतळा होता तो रशियाच्या विरोधकांनी पाडून टाकला.

युक्रेनमध्ये जिथे जिथे लेनिनचे पुतळे होते ते फोडण्यात आले. रशियावरील राग प्रतीकात्मकरीत्या प्रकट झाला. पण युक्रेनची परिस्थिती त्यामुळे सुधारली नाहीच शिवाय साम्यवादी विरोधक जे सत्तेवर आले त्यांनी युक्रेनचे अजून मातेरे केले. वस्तुस्थिती आता अशी आहे की युक्रेनला रशियावर त्यामुळे अजून विसंबून राहण्याची पाळी आली. युक्रेनमधे गेल्या वर्षी तेथील गल्लीबोळात असलेले लेनिनचे १३७०
पुतळे पाडून टाकले. रशियातही लेनिनचे पुतळे नकोसे होऊ लागलेत. त्याच्या अनेक वर्षे जपून ठेवलेल्या पार्थिवाची आता कायमची विल्हेवाट लावा, असे आता रशियातील तरुण पिढी बोलत आहे.

लेनिनचा मृत्यू १९२१ साली झाला. बोल्शेविक क्रांतिचा प्रणेता, सोव्हिएत रशियातील कम्युनिस्ट पक्षाचा संस्थापक व सोव्हिएत युनियनचा प्रिमियर म्हणून ब्लादिमिर लेनिनचे स्थान अढळ होते. मात्र २६ डिसेंबर १९९१ रोजी सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्यानंतर लेनिनच्या जगभरातील पुतळ्यांना वाईट दिवस आले. जगभरात लेनिनचा हा पुतळा हे रशियातील कम्युनिस्ट विचारसरणीचे एक प्रबळ प्रतीक मानले जात असे. मात्र त्या पुतळ्यांचा दबदबा सोव्हिएत रशियाचे विघटन झाल्यानंतर कमी होऊ लागला. युक्रेनमध्ये लेनिननचा पुतळा उद्ध्वस्त करण्यात आला. त्याशिवाय रशियातील काही भाग तसेच लिथुआनिया, लॅटव्हिया, मंगोलिया, घाना, क्युबा, व्हिएतनाम, जॉर्जिया, स्वालबार्ड, चेचेन्या, ताजिकिस्तान, इथिओपिया, बल्गेरिया, सिएटल येथे असलेले लेनिनचे पुतळेही असेच कालौघात उद्ध्वस्त करण्यात आले.
ब्लादिमिर लेनिन याचे निधन २१ जानेवारी १९२४ रोजी झाले. तो ह्यात असतानाच त्याचे नाव रशियातील चौकांना, रस्त्यांना देण्याची पद्धत रूढ होऊ लागली होती. लेनिनच्या मृत्यूनंतर त्याची अंत्ययात्रा काढू नका, त्याचे पुतळे उभारू नका, अशी इच्छा त्याची पत्नी कुपस्काया हिने व्यक्त केली होती. लेनिनचीही तशीच इच्छा होती असे तिचे म्हणणे होते. मात्र स्टॅलिन हा धूर्त होता. त्याने लेनिन मेल्यानंतर त्याचे पार्थिव जतन करून ठेवले, लेनिनची भव्य अंत्ययात्रा काढली, त्याचे स्मारक बांधले. हे सारे करण्यामागे लेनिनच्या नंतर रशियाची सत्तासूत्रे संपूर्णपणे आपल्या हाती येण्यात कोणताही अडथळा यायला नको म्हणून या सा-या गोष्टी स्टॅलिनने चालविल्या होत्या. व्होल्गा जेव्हा लाल होते या वि. स. वाळिंबे लिखित लेनिनच्या चरित्रग्रंथात या सा-या घटनांचे तपशील बारकाईने देण्यात आलेले आहेत. रशियात लेनिनच्या मृत्यूनंतर त्याचे पुतळे उभारायचे पेवच फुटले. त्यातील काही पुतळे सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर तोडण्यात आले. रशियात लेनिनचे जे पुतळे उरलेले आहेत त्यांचीही भविष्यात किती पत्रास ठेवली जाईल हे सांगता येत नाही.
युक्रेनप्रमाणे उद्या रशियातही लेनिनचे नाव पुसण्याचा प्रयत्न होऊ शकतो पण या प्रतीकात्मक गोष्टींनी त्या देशाचे प्रश्न काही सुटणार नाहीत. चार्वाक निरीश्वरवादी होता. त्याने वेद वगैरे सगळे त्याज्य आहेत हे सांगितले पण मग स्वीकारायचे काय हा ठाम पर्याय तो देऊ शकला नाही. परिणामी चार्वाकच संपला. ज्या भाजपावाल्यांनी लेनिनचा पुतळा पाडला त्यांनी चार्वाकला नीट लक्षात ठेवावे. पुतळे पाडून त्या महापुरुषाच्या विचारांचे महत्त्व कमी होत नाही.

Web Title: What will happen to the statue?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.