नारायण राणे, प्रकाश जावडेकर यांच्या खासदारकीचे काय होणार? महाराष्ट्रातील सहा जागा रिक्त होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 08:11 AM2024-01-05T08:11:35+5:302024-01-05T08:13:56+5:30
६८ रिक्त जागांपैकी दिल्लीतील तीन जागांसाठी आधीच निवडणुकीची घोषणा झाली आहे. सिक्कीममधील राज्यसभेच्या एकमेव जागेसाठीही निवडणूक जाहीर झाली आहे.
नवी दिल्ली : नऊ केंद्रीय मंत्र्यांसह राज्यसभेच्या ६८ सदस्यांचा कार्यकाळ यावर्षी पूर्ण होत आहे. त्यामुळे विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांत आतापासूनच चढाओढ सुरू झाली आहे. या ६८ रिक्त जागांपैकी दिल्लीतील तीन जागांसाठी आधीच निवडणुकीची घोषणा झाली आहे. सिक्कीममधील राज्यसभेच्या एकमेव जागेसाठीही निवडणूक जाहीर झाली आहे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव, आरोग्यमंत्री मनसुख मांडविया आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यासह ५७ नेत्यांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात पूर्ण होत आहे. उत्तर प्रदेशात सर्वाधिक १० जागा रिक्त होत आहेत. त्यानंतर महाराष्ट्र, बिहारमध्ये प्रत्येकी सहा, मध्य प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी पाच, कर्नाटक, गुजरातमध्ये प्रत्येकी चार, ओडिशा, तेलंगणा, केरळ आणि आंध्र प्रदेशात प्रत्येकी तीन, झारखंड, राजस्थानात प्रत्येकी दोन, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरयाणा आणि छत्तीसगडमध्ये प्रत्येकी एक जागा रिक्त होणार आहे. चार नामनिर्देशित सदस्यांचा कार्यकाळ जुलैमध्ये पूर्ण होत आहे. भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा सध्या हिमाचल प्रदेशमधून राज्यसभेचे सदस्य आहेत; पण पुन्हा उमेदवारी मिळविण्यासाठी त्यांना त्यांच्या गृहराज्याबाहेरील जागा शोधावी लागेल.
महाराष्ट्रातील सहा जागा रिक्त होणार
महाराष्ट्रातून राज्यसभेवर गेलेले परराष्ट्र राज्य मंत्री व्ही. मुरलीधरन, केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, काँग्रेसचे कुमार केतकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना चव्हाण आणि शिवसेनेचे (यूबीटी) अनिल देसाई यांचाही कार्यकाळ पूर्ण होत आहे.