'जे काही झाले ते नकळत ...'; 'गोमूत्र राज्य' वक्तव्याबाबत DMK खासदार सेंथिल कुमार यांनी माफी मागितली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 02:24 PM2023-12-06T14:24:19+5:302023-12-06T14:26:31+5:30
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकसभेत वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल द्रमुकचे खासदार सेंथिल कुमार यांना भाजप खासदारांनी घेरले आणि त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, द्रमुकचे खासदार सेंथिल कुमार यांनी 'गोमूत्र' बाबत एक वादग्रस्त वक्तव्य केले असून यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. याबाबत आता खासदार सेंथिल कुमार यांनी माफी मागितली आहे. "मी हे विधान नकळत केले आहे. जर भावना दुखावल्या असतील तर मी ते परत घेतो.", असं ते म्हणाले.
भाजपाच्या १२ खासदारांचे राजीनामे; मोदींसमवेतच्या बैठकीत भाजपची ठरली रणनिती
खासदार सेंथिल कुमार म्हणाले, "काल मी नकळतपणे दिलेल्या विधानामुळे सदस्यांच्या आणि लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर मी ते परत घेऊ इच्छितो. मी ते शब्द हटवण्याची विनंती करतो. त्याबद्दल मला खेद वाटतो." तत्पूर्वी, केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल म्हणाले, "सभागृहात केलेल्या टिप्पणीबद्दल त्यांनी माफी मागितली नाही. इंडिया आघाडीचे सर्व पक्ष त्यांच्या पाठीशी उभे आहेत. हे पक्ष देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न करत आहेत का? या देशाचे विभाजन कोणीही करू शकत नाही, असंही केंद्रीय मंत्री मेघवाल म्हणाले.
आज बुधवारी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेऊन सेंथिल कुमार तसेच काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडीच्या सर्व पक्षांवर निशाणा साधला. ते म्हणाले, "या लोकांची विचारसरणी हिंदू, हिंदी आणि सनातन धर्माची अधोगती आहे. हे लोक भारताची संस्कृती नष्ट करण्याचा कट रचत आहेत." अनुराग ठाकूर यांनीही सेंथिल कुमारच्या या वादग्रस्त टिप्पणीवर राहुल गांधींच्या मौनावर प्रश्न उपस्थित करत राहुल गांधी गप्प का आहेत?, असा सवाल केला.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेत जम्मू आणि काश्मीर आरक्षण विधेयक २०२३ आणि जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना विधेयक २०२३ वरील चर्चेदरम्यान, द्रमुक खासदार सेंथिल कुमार म्हणाले, “भाजपची ताकद प्रामुख्याने हिंदी राज्यांमध्ये आहे आणि या आपण स्वतः याला गोमूत्र राज्य म्हणतो, तिथे निवडणुका जिंकायच्या आहेत. तुम्ही दक्षिण भारतात येऊ शकत नाही. केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील निकाल पहा. "आम्ही तिथे खूप मजबूत आहोत, असंही ते म्हणाले होते.