बिहारच्या लष्करी शाळेचा व्हॉट्सअॅप ग्रूप हॅक; पाकिस्तानातून पाठवण्यात आले अश्लील फोटो
By मोरेश्वर येरम | Published: December 3, 2020 02:42 PM2020-12-03T14:42:29+5:302020-12-03T14:47:01+5:30
गोपळगंजच्या हथुआ स्थित लष्करी शाळेत हा प्रकार घडला आहे. शाळेतील विद्यार्थ्यांचा व्हॉट्सअॅप ग्रूप हॅक करुन त्यावर अश्लील फोटो आणि मेसेज टाकण्यात आले आहेत.
गोपाळगंज
बिहारच्या गोपाळगंज येथील लष्करी शाळेतील विद्यार्थ्यांचा व्हॉट्सअॅग ग्रूप हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. महत्वाची बाब म्हणजे हॅकिंग पाकिस्तानमधून झाल्याचं सांगितलं जात आहे.
गोपळगंजच्या हथुआ स्थित लष्करी शाळेत हा प्रकार घडला आहे. शाळेतील विद्यार्थ्यांचा व्हॉट्सअॅप ग्रूप हॅक करुन त्यावर अश्लील फोटो आणि मेसेज टाकण्यात आले आहेत. यासंदर्भात शाळेच्या व्यवस्थापनाकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि लष्कराच्या माहितीसाठी ही धोक्याची चिन्ह असल्याचं शाळेच्या व्यवस्थापनाकडून सांगण्यात आलं आहे.
पाकिस्तानी नंबरवरुन व्हॉट्सअॅप ग्रूप हॅक
व्हॉट्सअॅपवर ज्या ग्रूपच्या माध्यमातून विद्यार्थी ऑनलाइन क्लासमध्ये सहभागी होत असत तो ग्रूप हॅक करुन त्यावर अश्लील फोटो टाकण्यात आले आहेत. परदेशातून हे हॅकिंग झालेले असल्याने प्रकरण गंभीर असल्याचं व्यवस्थापनानं म्हटलं आहे. व्हॉट्सअॅपवर ज्या नंबरवरुन अश्लील पोस्ट आणि मेसेज टाकण्यात आले आहेत तो नंबर पाकिस्तानचा असल्याचं समोर आलं आहे.
लष्करी शाळेचा थेट संरक्षण मंत्रालयाशी संबंध असल्याने आणि पाकिस्तानातून हॅकिंग झाल्याचे निष्पन्न झाल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अज्ञात हॅकर विरोधात एफआयआर दाखल केली असून चौकशीला सुरुवात झाली आहे.