'रात्री मला भेटावं लागेल', व्हायरल व्हॉट्सअप चॅटमुळे हिमाचलच्या राजकारणात काँग्रेस-भाजपात जुंपली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 10:13 AM2022-04-08T10:13:15+5:302022-04-08T10:45:42+5:30
Himachal Pradesh Assembly Speaker's Whats App Chat viral : हिमाचल प्रदेशमधील भाजपा नेते आणि विधानसभेचे उपाध्यक्ष हंस राज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या चॅटमध्ये हंसराज यांनी एका महिलेला कामाच्या बदल्यात रात्री येण्यास सांगितले होते. तसेच त्यांच्या राहण्याची व्यवस्था आपण करू, असे सांगितले.
सिमला - हिमाचल प्रदेशमधीलभाजपा नेते आणि विधानसभेचे उपाध्यक्ष हंस राज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी व्हॉट्सअॅप चॅटच्या एका स्क्रिनशॉटमुळे ते चर्चेत आले आहेत. एका महिलेसोबतचे त्यांचे व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार चुराह येथील भाजपा आमदार आणि हिमाचल प्रदेश विधानसभेचे उपाध्यक्ष डॉ. हंसराज यांनी त्यांच्या प्रतिमा हननाचा प्रयत्न झाल्याचा आरोप करत चंबा येथील तीसा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. तपासामधून सारे काही समोर येईल, तसेच अशा प्रकारचे प्रयत्न करणाऱ्यांना सोडलं जाणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
हा स्क्रीनशॉट सर्वप्रथम युवा काँग्रेस चुराहच्या फेसबुक पेजवर अपलोड झाला होता. या स्क्रिनशॉटच्या माध्यमातून डॉ. हंसराज यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. डीएसपी मयंक चौधरी यांनी सांगितले की, तीसा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. तसेच आता तपासासाठी धर्मशाला येथील फॉरेंसिक लॅबची मदत घेतली जात आहे. तिचे रिपोर्ट आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.
या चॅटबाबत दावा करण्यात येत आहे की, हंसराज यांनी एका महिलेला कामाच्या बदल्यात रात्री येण्यास सांगितले होते. तसेच त्यांच्या राहण्याची व्यवस्था आपण करू, असे सांगितले. या कथित चॅटमध्ये महिला लिहिते की, माझं काम तुम्ही करणार ना, त्यावर हंस राज यांनी सांगितलं की, तुम्ही भेटा तर आधी, सर्व होऊन जाईल. त्यावर ही महिला विचारते की, सकाळी किती वाजता येऊ, त्यावर ते सांगतात की, संध्याकाळच्या वेळी या. राहण्याचा बंदोबस्त मी करतो. त्यावर ती महिला सांगते की, संध्याकाळी येऊ शकत नाही, माझं काम झालं नाही तर, त्यानंतर हंसराज यांनी सांगितलं की, काम करेन मी, पण रात्री मला भेटावं लागेल.
दरम्यान, हिमाचल प्रदेश विधानसभेचे उपाध्यक्ष डॉ. हंसराज यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत. चुराह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडे कुठलाही मुद्दा उरलेला नाही. त्यामुळे ते असे हातखंडे वापरत आहेत, या प्रकरणी मी तक्राप दाखल केली आहे. तसेच लवकरच दोषींविरोधात कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, लोकमत या व्हॉट्सअॅप चॅटच्या सत्यतेला दुजोरा देत नाही.