आपत्कालीन स्थितीत व्हॉटस्अॅप, फेसबुक होईल बंद?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2018 06:27 AM2018-08-07T06:27:52+5:302018-08-07T06:28:04+5:30
समाज माध्यमांतून (सोशल मीडिया) पसरणाऱ्या अफवा आणि त्यातून निर्माण होणा-या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणीबाणीच्या स्थितीत व्हॉट्सअॅप, फेसबुकसह सर्व सोशल मिडिया अॅप्स्वर प्रतिबंध आणण्याचा मार्ग केंद्र सरकार शोधत आहे.
- संतोष ठाकूर
नवी दिल्ली : समाज माध्यमांतून (सोशल मीडिया) पसरणाऱ्या अफवा आणि त्यातून निर्माण होणा-या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणीबाणीच्या स्थितीत व्हॉट्सअॅप, फेसबुकसह सर्व सोशल मिडिया अॅप्स्वर प्रतिबंध आणण्याचा मार्ग केंद्र सरकार शोधत आहे. माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने याबाबत दूरसंचार मंत्रालयाशी चर्चा सुरू केली आहे. विशेष म्हणजे आपत्कालीन स्थितीत इंटरनेट सुरु राहिले तरी हे अॅप मात्र बंद केले जातील.
दूरसंचार खात्याच्या वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, व्हॉट्सअॅप, फेसबुक किंवा इतर कोणत्याही समाज माध्यमांवर लगेचच प्रतिबंध लादले जातील, असा याचा अर्थ नाही. परंतु, विशिष्ट भागात तणाव वाढत असेल तर किंवा आणीबाणीची स्थिती उत्पन्न होत आहे असे दिसले तर त्यावेळी सोशल मीडिया अॅप्सवर प्रतिबंध कसे आणता येतील याचे पर्याय शोधले जावेत व त्याबाबत दिशा-निर्देश निश्चित केले जावेत अशी यामागची भूमिका आहे.
अलिकडेच मुले पळविणारी कथित टोळी, गाय तस्करीसह काही मुद्यांवर देशात विविध भागात तणाव निर्माण झाला आणि कायदा व सुव्यवस्था बिघडली. या सर्व प्रकरणात हे दिसून आले की, सोशल मीडियाची यात महत्त्वाची भूमिका होती. त्यामुळेच आम्ही आपत्कालीन परिस्थितीत सोशल मीडिया अॅप्सला प्रतिबंधित करण्यासाठी दिशा- निर्देश तयार करु इच्छितो, असे एका अधिकाºयाने सांगितले.