...तर आम्ही त्यासाठीही तयार; 'प्रायव्हसी पॉलिसी'वरून व्हॉट्स ऍपनं स्पष्टच सांगितलं
By कुणाल गवाणकर | Published: January 20, 2021 04:59 PM2021-01-20T16:59:08+5:302021-01-20T17:01:19+5:30
WhatsApp New Privacy Policy: व्हॉट्स ऍपकडून सविस्तर स्पष्टीकरण; डेटा, चॅट सुरक्षित असल्याचा पुनरुच्चार
नवी दिल्ली: नव्या गोपनीयता धोरणामुळे (WhatsApp New Privacy Policy) व्हॉट्स ऍप वादात सापडलं आहे. आम्ही वापरकर्त्यांचे मेसेज वाचत नाही, त्यांचा डेटा पूर्णपणे सुरक्षित ठेवला जात असल्याचं स्पष्टीकरण कंपनीकडून देण्यात आलं. मात्र तरीही व्हॉट्स ऍपच्या नव्या धोरणाबद्दलचा संशय दूर झालेला नाही. त्यातच काल केंद्र सरकारनं व्हॉट्स ऍपकडे नवं धोरण रद्द करण्याची मागणी केली. त्यानंतर आता व्हॉट्स ऍपकडून सविस्तर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
धोरणातील प्रस्तावित बदल मागे घ्या, व्हॉट्सॲपला केंद्राचे खरमरीत पत्र
व्हॉट्स ऍपची मालकी फेसबुककडे आहे. नव्या धोरणामुळे व्हॉट्स ऍपकडे असलेला डेटा फेसबुकला दिला जाईल. त्यामुळे गोपनीयतेचा भंग होईल. व्हॉट्स ऍपकडून वापरकर्त्यांचे मेसेज वाचले गेल्यानं गोपनीयता जपली जाणार नाही, अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. त्यावर आता व्हॉट्स ऍपनं खुलासा केला आहे. लोकांच्या मनातला संभ्रम दूर करण्याचं काम सुरू आहे. याबद्दलचे सर्व प्रश्न देण्यास आम्ही तयार आहोत, असं व्हॉट्स ऍपनं म्हटलं आहे.
WhatsApp Web च्या सुरक्षिततेलाही धोका; युजर्सचे फोन नंबर Google Search वर लीक, रिपोर्टमधून दावा
गोपनीयता धोरण अपडेट केल्यावर आमच्याकडून फेसबुकसोबत कोणताही डेटा शेअर करणार नाही. पारदर्शकपणा कायम राखणं हेच आमचं उद्दिष्ट आहे. नवे पर्याय व्यवसायिकांसाठी आहेत. त्यांचा व्यवसाय वाढावा यासाठी ते उपलब्ध करून देण्यात आले आहेत. व्यवसायिकांना ग्राहकांना चांगली सुविधा देता यावी, हा हेतू त्यामागे आहे. व्हॉट्स ऍपमधील पर्सनल मेसेज एंड टू एंड एनक्रिप्शनच्या माध्यमातून सुरक्षित आहेत. हे मेसेज व्हॉट्स ऍप, फेसबुकदेखील पाहू शकत नाही. लोकांच्या मनातला संभ्रम, शंका दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. कोणत्याही प्रश्नांची उत्तरं देण्याची आमची तयारी आहे, असं व्हॉट्सच्या प्रवक्त्यांनी स्पष्टीकरणात नमूद केलं आहे.
व्हॉट्स ऍपच्या नव्या गोपनीय धोरणामुळे वापरकर्ते चिंतेत आहेत. वापरकर्त्यांना त्यांच्या डेटा आणि चॅट्सची चिंता वाटत आहे. ही चिंता दूर करण्याचा प्रयत्न व्हॉट्स ऍपनं स्पष्टीकरणाच्या माध्यमातून केला आहे. सर्व खासगी चॅट्स एनक्रिप्टेड आणि सुरक्षित असल्याचं व्हॉट्स ऍपनं सांगितलं आहे. मात्र तरीही अनेकांना व्हॉट्स ऍपवर विश्वास नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसांत अनेकांनी सिग्नल आणि टेलिग्राम यांच्यासारखे ऍप डाऊनलोड केले आहेत.