व्हाट्सअॅप तुमचा मोबाईल नंबर फेसबूकसोबत शेअर करणार
By Admin | Published: August 26, 2016 08:55 AM2016-08-26T08:55:08+5:302016-08-26T08:55:08+5:30
लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हाट्सअॅपने आपल्याचं धोरणाला छेद देत युझर्सची माहिती फेसबूकसोबत शेअर करण्याचा निर्णय घेतला आहे
>- ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 26 - लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हाट्सअॅपने आपल्याचं धोरणाला छेद देत युझर्सची माहिती फेसबूकसोबत शेअर करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये महत्वाचं म्हणजे व्हॉट्सअॅप आपला मोबाईल नंबरदेखील सहकारी कंपनी फेसबूकसोबत शेअर करणार आहे. फेसबूकच्या माध्यमातून जास्तीत जास्त जाहिराती व्हॉट्सअॅप युझर्सपर्यंत पोहोचवता याव्यात हा त्यामगचा हेतू असल्याचं कळत आहे.
व्हाट्सअॅपने नेहमी आपल्या युझर्सचा डेटा गुप्त ठेवण्यात येईल याची हमी दिली आहे. फेसबूकने जेव्हा व्हाटस्अॅप विकत घेतलं तेव्हाही युझर्सची माहिती गुप्त ठेवण्यात येईल असा विश्वास देण्यात आला होता. आता मात्र त्यांनी आपल्या धोरणात बदल केला आहे.
या निर्णयामुळे फेसबूकला व्हाट्सअॅप युझर्सचा मोबाईल क्रमांक सहजरित्या मिळणार आहे. याचा अर्थ तुमचा मोबाईल क्रमांक आणि माहिती फेसबूककडे उपलब्ध असणार आहे. त्यामुळे फेसबूक आणि व्हाट्सअॅप वापरणा-यांची माहिती त्यांच्याकडे उपलब्ध असेल आणि जास्तीत जास्त जाहिराती तुम्हाला पाठवल्या जातील.
व्हाट्सअॅपच्या या निर्णयामुळे युझर्सची खासगी माहिती उघड होत आहे, ज्याला विरोध होणं स्वाभाविक आहे. ज्याप्रमाणे फेसबूक खासगी माहितीचा वापर जाहिरातीसाठी करतं त्याचप्रमाणे आता व्हाट्सअॅपशी हातमिळवणी झाल्याने युझर्सच्या डोक्याचा ताप वाढणार आहे. या जाहिराती फेसबूकवर असतील, त्याचा व्हॉट्सअॅप जाहिरातींशी काहीही संबंध नसेल, असा कंपनीचा दावा आहे. तसंच आमचा व्यवसाय आमच्या करारबद्ध ग्राहकांपर्यंत कसा पोहोचता येईल, याचीही आम्ही चाचपणी करत आहोत, असंही व्हॉट्सअपने म्हटलं आहे. मात्र हे पाऊल उचलण्यापूर्वी व्हॉट्सअॅपला जगभरातील हजारो कोटी युझर्सचा डेटा कसा सुरक्षीत राहिल, हा विश्वास देणं गरजेचं आहे.