गहू- तांदूळ महागणार! देशातील धान्याचा साठा पाच वर्षातील नीचांकी पातळीवर, वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 03:09 PM2022-10-14T15:09:20+5:302022-10-14T15:09:57+5:30
देशातील सरकारी गोदामांमधील अन्नधान्याचा साठा गेल्या पाच वर्षांतील नीचांकी पातळीवर आहे. त्यामुळे अनुदानावर अन्नधान्य उपलब्ध करून देणाऱ्या सरकारी यंत्रणेवर येत्या काही दिवसांत ताण येणार आहे.
नवी दिल्ली : देशातील सरकारी गोदामांमधील अन्नधान्याचा साठा गेल्या पाच वर्षांतील नीचांकी पातळीवर आहे. त्यामुळे अनुदानावर अन्नधान्य उपलब्ध करून देणाऱ्या सरकारी यंत्रणेवर येत्या काही दिवसांत ताण येणार आहे. शेतकर्यांनी अजुनही गव्हाची पेरणी केलेली नाही आणि पुढील पीक १५ मार्चनंतरच बाजारात येण्याची अपेक्षा आहे.
रोजच्या वापरातील वस्तू, आणि भाजीपालांचे दर गगनाला भिडले आहेत. आता भारतीय अन्न महामंडळच्या अहवालानुसार, या हंगामातील हिवाळ्यात पेरणी केलेले गहू आणि तांदूळ दोन्ही पिके खराब झाली आहेत. त्यामुळे किंमती २२ महिन्यांच्या उच्चांकीवर पोहोचल्या आहेत.
कोट्यवधीची रोकड, सोने, दागदागिने, अधिकाऱ्यांच्या घरावरील EDच्या धाडीत सापडले घबाड
१ ऑक्टोबर रोजी सरकारी गोदामांमध्ये गहू आणि तांदळाचा एकूण साठा ५११.४ लाख टन होता. वर्षभरापूर्वी हा आकडा ८१६ लाख टन होता. देशात गहू आणि तांदळाच्या किमती वाढू नयेत आणि देशांतर्गत बाजारपेठेत त्यांचा पुरेसा पुरवठा व्हावा यासाठीच सरकारने गहू आणि तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे.
१ ऑक्टोबर रोजी सरकारी गोदामांमध्ये २२७.५ लाख टन गव्हाचा साठा होता. गेल्या ६ वर्षातील गव्हाच्या साठ्याची ही सर्वात कमी पातळी आहे. तर तांदळाचा साठा आवश्यक्तेपेक्षा जवळपास २.८ पट जास्त होता. सप्टेंबर २०२२ अन्नधान्य उत्पादनांचा महागाई दर ११.५३ टक्के होता.
त्यामुळे आता पुन्हा गव्हाचे दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचा परिणाम सर्वसामान्यांवर बसणार आहे. गव्हाच्या आट्याचे दर वाढण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यातील महागाईची आकडेवारी पाहिल्यास गहू आणि पिठाचा वार्षिक किरकोळ महागाई दर १७.४१ टक्क्यांवर गेल्याचे दिसते. गेल्या आठ महिन्यांतील ही उच्चांकी आहे.