मुलगी शिकते तेव्हा..., ‘त्या’ वक्तव्याने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार वादात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 05:52 AM2023-11-09T05:52:33+5:302023-11-09T07:00:29+5:30
नितीशकुमार यांनी केलेल्या वक्तव्यावर काँग्रेसने मौन बाळगले; परंतु शिवसेनेने मोर्चा सांभाळला.
- एस. पी. सिन्हा/आदेश रावल
पाटणा : लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी महिलांमध्ये शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंगळवारी सभागृहात ‘सुशिक्षित महिला आपल्या पतीला संभोगाच्या वेळी ‘थांबवू’ शकते,’ असे म्हटल्याने वाद निर्माण झाला आहे. या विधानावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत गदारोळ झाला. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री त्यांच्या या वक्तव्यावर बॅकफूटवर आले. ते म्हणाले की, माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे. त्यावर टीका होत असेल तर ते आपले विधान मागे घेऊन माफीही मागतो.
बुधवारी विधानसभेचे कामकाज सुरू होताच भाजप आमदारांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली. विरोधी पक्षनेते विजय सिन्हा म्हणाले की, नितीश कुमार यांनी महिलांबाबत अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. हे खूपच लज्जास्पद आहे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. यानंतर विरोधक हौद्यात पोहोचले आणि गदारोळ सुरू केला. तेथील टेबल आणि खुर्ची पाडली. यावर संसदीय कामकाज मंत्री विजय चौधरी म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. त्यामुळे प्रकरण मिटले आहे. दरम्यान, दिल्ली भाजपच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी चाणक्यपुरी येथील बिहार भवनजवळ निदर्शने केली आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
मुख्यमंत्री म्हणाले...
आम्ही स्त्री शिक्षणावर खूप भर देत आहोत. जेव्हा मुलगी शिकते तेव्हा प्रजनन दर कमी होतो. अहवालाने याची पुष्टी केली आहे. मी शिक्षणाबद्दल बोलत होतो, मात्र माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. जर मी अनौपचारिकपणे काही बोललो असेन तर मी माफी मागतो.
काँग्रेसचे मौन; सेनेने सांभाळला मोर्चा
नितीशकुमार यांनी केलेल्या वक्तव्यावर काँग्रेसने मौन बाळगले; परंतु शिवसेनेने मोर्चा सांभाळला. महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा व शिवसेनेच्या राज्यसभा सदस्य खा. प्रियंका चतुर्वेदी आमने-सामने आल्या. रेखा शर्मा यांनी म्हटले की, कोणीही मुख्यमंत्री अशा भाषेचा वापर कसा काय करू शकतो? यावर प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटले की, एक महिला असल्यामुळे मी या वक्तव्याचा निषेध करीत आहे. नितीशकुमार आपले शब्द परत घेतील, अशी मला आशा आहे. परंतु आयोगाच्या प्रमुख या नात्याने तुम्ही आम्हाला निराश केले आहे.