अन् मायावतींसमोर अजित सिंह यांना काढावे लागले बूट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2019 12:46 PM2019-04-13T12:46:49+5:302019-04-13T12:54:41+5:30

2014 च्या लोकसभा निवडणुकीत बसपाला एकही जागा जिंकता आली नव्हती. मात्र आता सपा-बसपा-आरएलडी पक्षांची आघाडी झाल्याने मायावतींचे महत्त्व वाढले आहे. या आघाडीच्या प्रचारासाठी बसपा अध्यक्षा मायावती ठिकठिकाणी प्रचारसभा घेत आहेत.

when ajit singh had to took off shoes to share the stag with mayawati | अन् मायावतींसमोर अजित सिंह यांना काढावे लागले बूट

अन् मायावतींसमोर अजित सिंह यांना काढावे लागले बूट

Next
ठळक मुद्देसपा-बसपा-आरएलडी पक्षांची आघाडी झाल्याने मायावतींचे महत्त्व वाढले आहे. या आघाडीच्या प्रचारासाठी बसपा अध्यक्षा मायावती ठिकठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. मायावती यांच्यासोबत व्यासपीठावर बसण्यासाठी आरएलडीचे नेते अजित सिंह यांना पायातील बूट काढून व्यासपीठावर जावे लागले. व्यासपीठावर कोणी बूट घालून आलेले मायावती यांना चालत नाही, असे या को-ऑर्डिनेटरने अजित सिंह यांना सांगितले.

लखनौ - उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीची जोरदार रंगत पाहायला मिळत आहे. सपा-बसपा आणि भाजपाने प्रचारात आघाडी घेतली आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत बसपाला एकही जागा जिंकता आली नव्हती. मात्र आता सपा-बसपा-आरएलडी पक्षांची आघाडी झाल्याने मायावतींचे महत्त्व वाढले आहे. या आघाडीच्या प्रचारासाठी बसपा अध्यक्षा मायावती ठिकठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. आघाडीच्या प्रचारसभा, कार्यक्रमात व्यासपीठावर कोण-कोण उपस्थित असणार, कोण केव्हा बोलणार या सर्व गोष्टी मायावती ठरवत आहेत. 

देवबंदमध्ये प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. बसपा अध्यक्षा मायावती यांच्यासोबत व्यासपीठावर बसण्यासाठी आरएलडीचे नेते अजित सिंह यांना पायातील बूट काढून व्यासपीठावर जावे लागले. मायावती यांच्यामुळेच अजित सिंह यांना बूट काढावे लागल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी सहारनपूरमधील देवबंद येथे प्रचार सभा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर मायावती आणि अखिलेश यादव बसले होते. अजित सिंह हे व्यासपीठावर चढण्याच्या तयारीत असताना बसपाचे कॉ-ऑर्डिनेटर यांनी अजित सिंह यांना पायातील बूट काढण्यास सांगितले. व्यासपीठावर कोणी बूट घालून आलेले मायावती यांना चालत नाही, असे या को-ऑर्डिनेटरने अजित सिंह यांना सांगितले. एका हिंदी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी मायावती आणि बहुजन समाजाच्या मतांची गरज लागणार आहे. त्यामुळे मायावती दुखावणार नाही, याची काळजी घेत त्यांचे काही नियम सपा आणि आरएलडीकडून पाळण्यात येत आहेत. मायावती उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री असतानाही त्यांनी हा नियम बनवला होता.  कोणत्याही मंत्री किंवा अधिकाऱ्यांना मायावती यांची भेट घ्यायची असेल तर त्यांना बूट काढूनच मायावती यांच्यासमोर जावे लागत होते. मायावती यांना धुळीची अ‍ॅलर्जी असल्याने त्यांनी हा नियम तयार करण्यात आल्याचे त्यांच्या जवळच्या व्यक्तीने सांगितले आहे.  

...तर मला पंतप्रधान होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही- मायावती

मायावती यांनी काही दिवसांपूर्वी गौतमबुद्ध नगर लोकसभा मतदारसंघात एक रॅली केली होती. या रॅलीदरम्यान त्यांनी जनतेला संबोधित केलं. त्या म्हणाल्या, उत्तर प्रदेश राज्यानं मला साथ दिली, तर पंतप्रधान बनण्यासह लोकांच्या समस्या सोडवण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही. तसेच या रॅलीदरम्यान त्यांनी गुर्जर, दलित आणि मुस्लिम मतदारांना आपलंसं करण्यासाठी अनेक आश्वासनं दिली. यावेळी त्यांनी महागठबंधनकडून स्वतः पंतप्रधानपदासाठी दावेदार असल्याचं स्पष्ट केलं होतं. 'महागठबंधनला उत्तर प्रदेशमधून चांगलं यश मिळाल्यास मला पंतप्रधान होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. मी पंतप्रधान झाल्यास जनतेच्या तुमच्या समस्या चुटकीसरशी सोडवेन' असंही आश्वासनही मायावती यांनी दिलं आहे. 'देशातून मोदी आणि योगींना पळवून लावलं पाहिजे. कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नका, एकत्र येऊन मतदान करा. मी उत्तर प्रदेशची मुलगी आहे. तुमची बहीण आहे' असं ही मायावती यांनी म्हटलं होतं. 
 

Web Title: when ajit singh had to took off shoes to share the stag with mayawati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.