Omicron In India: भारतात कधी आणि कोणत्या देशातून घुसला ओमायक्रॉन? नव्या व्हेरिअंटमुळे सरकार अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 06:24 PM2021-12-02T18:24:39+5:302021-12-02T18:25:37+5:30
Omicron Case Found In India: बंगळुरुमध्ये दोन ओमायक्रानने बाधित रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे हे रुग्ण कुठून आले, कसे आले याबाबत चर्चा होऊ लागली आहे.
बंगळुरू: कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटचे भारतात दोन रुग्ण सापले आहेत. जगाला दहशतीत टाकणाऱ्या या ओमायक्रॉनच्या धोक्याबाबत कोणीच काहीही सांगू शकत नाहीत. शक्यतो सारे देश खबरदारी घेत आहेत असे असले तरी आतापर्यंत जवळपास 29 देशांत या व्हेरिअंटचे रुग्ण सापडले आहेत. अशातच बंगळुरुमध्ये दोन ओमायक्रानने बाधित रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे हे रुग्ण कुठून आले, कसे आले याबाबत चर्चा होऊ लागली आहे.
कर्नाटकने आज देशाला हादरविणारी बातमी दिली. काही दिवसांपूर्वीच हे रुग्ण दक्षिण आफ्रिकेहून विमानाने बंगळुरुमध्ये दाखल झाले होते. यांची तपासणी केली असता ते कोरोना पॉझिटिव्ह सापडले होते. यानंतर आरोग्य विभागाने ओमायक्रॉन व्हेरिअंटची बाधा झालीय का हे पाहण्यासाठी त्यांचे स्वॅब तपासणीला पाठविले होते. गुरुवारी त्यांना ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. कर्नाटकचे आरोग्य मंत्री डॉ. के सुधाकर यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वीच हे रुग्ण बंगळुरूमध्ये आले होते. त्यांची नावे जाहीर केलेली नाहीत.
29 देशांमध्ये आतापर्यंत 373 कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हायरसने लागण झालेले रुग्ण सापडले आहेत. याची लक्षणे आतापर्यंत सापडलेल्या कोरोना व्हेरिअंटपेक्षा वेगळी आहेत. हा व्हेरिअंट वेगाने पसरत असला तरी तो डेल्टाएवढा खतरनाक नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
ओमायक्रॉनने प्रभावित झालेल्या देशांमधून भारतात आतापर्यंत 3476 लोक आले आहेत. यापैकी 6 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह मिळाले होते. यातच कर्नाटकमध्ये सापडलेले दोन व्यक्ती देखील होते. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 9765 नवे रुग्ण साप़डले आहेत. तर 477 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे जीव गमावलेल्या रुग्णांची संख्या 4,69,724 एवढी झाली आहे.