Atal Bihari Vajpayee: ...जेव्हा वाजपेयींनी ममता बॅनर्जींच्या आईच्या पाया पडून घेतला होता आशीर्वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 03:42 PM2018-08-16T15:42:59+5:302018-08-16T15:43:48+5:30
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर एम्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी अनेक जण प्रार्थना करत आहेत.
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर एम्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी अनेक जण प्रार्थना करत आहेत. तसेच त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी एम्स रुग्णालयात देशातील दिग्गज नेत्यांनी गर्दी केली आहे. तर केंद्रातील निम्मं मंत्रिमडळ रुग्णालयात आहे. वाजपेयी यांचे पुतणे अनुप मिश्रा, करुणा शुक्ला आणि कुटुंबांतील इतर सदस्यही रुग्णालयात आहेत. याचबरोबर, भाजपाशासित सर्वच राज्यांतील मुख्यमंत्री दिल्लीकडे रवाना झाले आहेत.
अटल बिहारी वाजपेयी यांची राजकीय राजकीर्द अविस्मरणीय आहे. 2000 साली अटल बिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान होते. त्यावेळी त्यांच्या कॅबिनेटमध्ये ममता बॅनर्जी यांचा समावेश होत्या. ममता बॅनर्जी यांच्याकडे तेव्हा रेल्वेमंत्रिपद होते. एक दिवस अटल बिहारी वाजपेयी कोलकात्याच्या दौ-यावर गेले होते. त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या आईची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. 6 जुलै 2000मध्ये संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास वाजपेयी ममता बॅनर्जी यांच्या घरी पोहोचले. ममता बॅनर्जींचं त्यावेळी घर लहान होते. त्यामुळे ममता अटलजींना घरी बोलवण्यास टाळत होत्या. परंतु पंतप्रधान असूनही अटलजींच्या मनात कोणताही संकोच नव्हता. त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या घरी जाऊन त्यांच्या आई गायत्री देवींची भेट घेतली आणि जवळपास 20 मिनिटे चर्चा केली. ममता बॅनर्जी आणि त्यांच्या आईने अटल बिहारी वाजपेयी यांचे जोरदार स्वागत केले होते. तसेच गायत्री देवी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांनी एक गुलाबाचे फूल आणि शाल भेट दिली होती. या भेटीदरम्यान अटल बिहारी वाजपेयी यांनी गायत्री देवींच्या पाया पडून आशीर्वाद घेतला होता.
दरम्यान, तेव्हा या भेटीच्या चर्चेला राजकीय वळण देण्यात आले होते. ममता बॅनर्जी त्यावेळी वाजपेयी सरकारवर नाराज होत्या, असे काही जाणकारांचे म्हणणे होते. कारण वाजपेयी सरकारने तेव्हा पश्चिम बंगालमधील चार PSU (पब्लिक सेक्टर युनिट्स) बंद करण्याचा आदेश दिला होता. या आदेशाला ममता बॅनर्जी यांनी विरोध दर्शवत आपली नाराजी जाहीर केली होती. त्यामुळे अटल बिहारी वाजपेयी ममता बॅनर्जी यांची नाराजी दूर करण्यासाठी कोलकाता दौ-यावर आले होते. दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी अटल बिहारी वाजपेयींचा कोलकाता दौरा व्यक्तिगत असल्याचे सांगितले होते.