भाजप अध्यक्ष शहा लिफ्टमध्ये अडकतात तेव्हा...
By admin | Published: August 21, 2015 10:33 PM2015-08-21T22:33:02+5:302015-08-21T22:33:02+5:30
भाजप अध्यक्ष अमित शहा आणि पक्षाचे अन्य तीन वरिष्ठ नेते शनिवारी रात्री पाटणा येथील शासकीय विश्रामगृहाच्या एका लिफ्टमध्ये तब्बल ४० मिनिटे अडकून पडले होते
पाटणा : भाजप अध्यक्ष अमित शहा आणि पक्षाचे अन्य तीन वरिष्ठ नेते शनिवारी रात्री पाटणा येथील शासकीय विश्रामगृहाच्या एका लिफ्टमध्ये तब्बल ४० मिनिटे अडकून पडले होते. या घटनेनंतर भाजप आणि नितीशकुमार सरकार यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडायला सुरुवात झाली आहे. आवश्यकतेपेक्षा जास्त वजन झाल्यामुळे लिफ्ट अडकल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे.
‘शनिवारी रात्री ११.३० वाजता लिफ्ट दोन मजल्यांच्या मध्ये अडकली आणि लिफ्टचे धातूचे दारही बंद झाले होते. अशी आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी जवळपास कुठेही लिफ्ट आॅपरेटर वा सक्षम व्यक्ती नव्हता. दार बंद असल्याने मोबाईल फोनही लागत नव्हते,’ असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष मंगल पांडे यांनी सांगितले. या घटनेची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली, तर यामागे षड्यंत्र असल्याचा आरोप भाजप नेते खासदार सी. पी. ठाकूर यांनी केला.
शहा हे तळमजल्यावरून पहिल्या मजल्यावर लिफ्टने जात होते. या लिफ्टची क्षमता ३४० किलोची आहे. परंतु लिफ्टमध्ये शहांसह पाच जण चढल्याने ती अडकली. दरम्यान, शहांच्या झेड प्लस सुरक्षेत तैनात असलेल्या सीआरपीएफच्या जवानांनी लिफ्टचे पोलादी दार तोडून शहा आणि अन्य नेत्यांना बाहेर काढले. (वृत्तसंस्था)