कोरोना काळात रक्ताची नाती दुरावतात तेव्हा...; जितेंदर सिंग शन्टी यांनी सांगितला अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2021 12:08 PM2021-11-13T12:08:06+5:302021-11-16T15:17:28+5:30
माजी आमदार, समाजसेवक जितेंदर सिंग शन्टी यांना समाज सेवेसाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
नवी दिल्ली : माजी आमदार, समाजसेवक जितेंदर सिंग शन्टी यांना समाज सेवेसाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोरोना काळात शन्टी यांनी ज्याप्रकारे समाजसेवा केली, त्याचे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही केले. पद्मश्रीने सन्मानित करण्यात आल्यानंतर शन्टी यांनी कोरोना काळातील अनेक आठवणींना उजाळा दिला. त्यांनी या काळात अनेक मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत.
२५ वर्षांपासून ॲम्ब्युलन्स चालविणारे शन्टी म्हणतात की, नात्यांवरचा विश्वास उडावा, असे अनुभव या काळात आले आहेत. एका ठिकाणी दोन भाऊ मला म्हणत होते की, किती पैसे द्यायचे. मी विचारले, कशाचे पैसे. ही तर सेवा आहे. त्यावर एका भावाने वडिलांच्या खिशातून पैसे काढले आणि दुसऱ्या भावाकडे देत म्हणाला की, राहू दे आपल्याला. मी असे अनेक जण बघितले, जे वडिलांच्या मृतदेहाला हातही लावत नव्हते.
वडिलांचे अंत्यसंस्कार करण्यास मुलांचा नकार
एका कोट्यधीश व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर मी ॲम्ब्युलन्स घेऊन त्यांच्या घरासमोर जाऊन उभा राहिलो. दोन तासानंतरही काहीच हालचाल दिसली नाही, म्हणून मुलांना विचारले. तेव्हा मला असे समजले की, मुलांनी सेवा न केल्यामुळे त्यांच्या वडिलांनी सर्व संपत्ती सेवाभावी संस्थांना दान केली आहे. त्यावर आता मुलांचे असे म्हणणे होते की, आम्ही अंत्यसंस्कार करणार नाही. त्या संस्थांनीच करावेत. हे समजल्यावर मी पुढे आलो आणि अंत्यसंस्कार केले. अपघातानंतर मृत समजून एका व्यक्तीला कोणीच हात लावत नव्हते. मी तेथून जात होतो. त्या व्यक्तीला मी दवाखान्यात घेऊन गेलो आणि त्याचे प्राण वाचले, हा प्रसंग सांगताना, अपघातातील जखमींना मदतीसाठी कोणी पुढे येत नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.