केव्हा उघडलं जातं केदारनाथाचं द्वार ?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2018 10:47 AM2018-04-29T10:47:12+5:302018-04-29T10:47:12+5:30
उत्तराखंड, हृषिकेशच्या कणाकणात भगवान शिवाचं अस्तित्व आहे. त्यामुळेच या राज्यात नजर जाईल तिथे शीव मंदिरं दृष्टिक्षेपास पडतात. पूर्ण हिमालय हे भगवान शिवाचं निवासस्थान आहे.
डेहराडून- उत्तराखंड, हृषिकेशच्या कणाकणात भगवान शिवाचं अस्तित्व आहे. त्यामुळेच या राज्यात नजर जाईल तिथे शीव मंदिरं दृष्टिक्षेपास पडतात. पूर्ण हिमालय हे भगवान शिवाचं निवासस्थान आहे. भगवान भोलेनाथ सर्व भक्तांची मनोकामनाही पूर्ण करतात. त्यातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक केदारनाथ हे आहे. या मंदिराचे कपाट म्हणजे द्वार वर्षातील काही महिने बंद असते. ते आज सकाळी उघडले गेले. केदारनाथाच्या मंदिराचं कपाट म्हणजे द्वारे उघडणे आणि बंद होण्याच्या उत्सवाला डोली यात्रा संबोधलं जातं.
जे लोक तीन दिवसांची पायी यात्रा करून या मंदिरात येतात त्यांची इच्छा भगवान शंकर पूर्ण करत असल्याची आख्यायिका सांगितली जाते. या देवस्थानाच्या द्वार बंद आणि उघडण्याच्या परंपरेचा संबंध हिमवृष्टीशी आहे. हिवाळ्याच्या सुरुवातीला द्वार बंद होते, तर उन्हाळ्यात उघडले जाते. भगवान आशुतोष यांच्या डोली यात्रेला पुण्याची यात्राही म्हटलं जातं. जी यात्रा केदारनाथाचं कपाट म्हणजेच द्वार बंद होणे आणि उघडण्याशी निगडित आहे. हिवाळ्याच्या सुरुवातीला केदारनाथ धाम बर्फानं आच्छादित होतं. ही वेळ देवाची पूजा करण्याची असते. याच दरम्यान भगवान आशुतोष प्रवासासाठी बाहेर पडतात. केदारनाथ यांची डोली 26 एप्रिलला ओंकारेश्वर मंदिरातल्या भैरव पूजेनं सुरू झाली. 26 एप्रिलला ओंकारेश्वर मंदिरापासून निघालेली केदारनाथाची डोली यात्रा सकाळी 10 वाजता पडाव फाट्यापर्यंत पोहोचली. त्यानंतर 27 एप्रिलला डोली यात्रा गौरी कुंडाच्या जवळ दाखल झाली. 28 एप्रिलला शायंकाल पंचमुखी डोली यात्रा केदारनाथ मंदिरात पोहोचली असून, 29 एप्रिलला रविवारी सकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी केदारनाथ मंदिराचं कपाट म्हणजेच द्वार भाविकांसाठी खुलं करण्यात आलं आहे.
कपाट उघडण्याच्या मुहूर्तावर भगवान शिवाची डोली ओंकारेश्वर मंदिरातून केदारनाथाला आणली जाते आणि कपाट बंद झाल्यानंतर ही डोली पुन्हा ओंकारेश्वर मंदिरात नेली जाते. भगवान केदारनाथाच्या दोन मूर्ती आहेत. एक भोग मूर्ती ही पुजा-यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येते आणि त्याची पूजासुद्धा केली जाते. तर दुसरी भगवान केदारनाथाची पंचमुखी उत्सव मूर्ती आहे. यात भगवान शिवाची सत्योजात, वामदेव, अघोर, ततपुरुष आणि इशान रूपी मुख आहे. या मूर्तीच्या मागच्या भागात शेषनाग विराजमान असल्याचं पाहायला मिळतं. तसेच डोक्यावर सुवर्णमुकुट बसवलं जातं. या दिवसांत केदारनाथमध्ये प्रसन्न वातावरण असतं. 2013नंतर केदारनाथमध्ये निर्माणाच्या कार्यानं वेग घेतला. प्रवाशांसाठीही सरकारनं चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. भक्तांना दर्शनाबरोबरच पौराणिक कथाही सांगितल्या जातात.