कुटुंब कमकुवत, तेव्हा मूल्ये नष्ट होतात : मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 09:22 AM2024-02-26T09:22:50+5:302024-02-26T09:22:59+5:30
'गायत्री परिवारा'तर्फे आयोजित'अश्वमेध यज्ञ' कार्यक्रमाला व्हिडीओ संदेशाद्वारे संबोधित करताना पंतप्रधान बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : युवकांना व्यसनांच्या विळख्यापासून वाचवण्याची गरज असून, व्यसन सोडविण्यासाठी कुटुंबांच्या भक्कम पाठिंब्याची आवश्यकता असते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सांगितले.
'गायत्री परिवारा'तर्फे आयोजित'अश्वमेध यज्ञ' कार्यक्रमाला व्हिडीओ संदेशाद्वारे संबोधित करताना पंतप्रधान बोलत होते. औषधमुक्त भारत घडविण्यासाठी, मजबूत कुटुंबसंस्था आवश्यक आहे. जेव्हा कुटुंब कमकुवत होते तेव्हा मूल्ये नष्ट होऊ लागतात आणि नंतर त्याचा परिणाम व्यापक होतो. कुटुंब या संकल्पनेच्या महत्त्वावर चर्चा करताना पंतप्रधान म्हणाले की, जेव्हा कुटुंबातील सदस्य अनेक दिवस एकमेकांना भेटत नाहीत, तेव्हा धोके निर्माण होतात. त्यामुळे कुटुंबे मजबूत करण्याची आणि देशाला व्यसनमुक्त करण्याची गरज आहे. नवमतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
'मन की बात'ला तीन महिने अवकाश
आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राजकीय नीतिमत्तेनुसार पुढील तीन महिने 'मन की बात'चे प्रसारण होणार नाही, असे मोदी म्हणाले, आम्ही पुढच्या वेळी भेटू तेव्हा तो 'मन की बात'चा १११ वा भाग असेल. संख्याशी संबंधित शुभ लक्षात घेऊन, यापेक्षा चांगले काय असू शकते, असे ते म्हणाले, सत्ता कायम ठेवण्याचा विश्वास पंतप्रधानांनी वारंवार व्यक्त केला आहे.
केवळ एका कुटुंबाची प्रगती होण्यासाठी...
काँग्रेसने आपली सर्व शक्त्ती केवळ एका कुटुंबाची प्रगती साधण्यावर खर्च केली, असा घणाघात मोदींनी येथे केला, काँग्रेसच्या काळात सर्व प्रकारचे घोटाळे होत होते. गेल्या दहा वर्षात आपल्या सरकारने ते थांबवले आहेत. द्वारका येथे विविध प्रकल्पांचे उद्घाटन व पायाभरणी केल्यानंतर ते बोलत होते. उद्घाटन झालेल्या प्रकल्पांत गुजरातमधील ओखा ते बेट द्वारका या भारतातील सर्वात लांब केबल-स्टेड पुलाचाही समावेश आहे.