मी तुमच्याएवढा होतो, तेव्हा कोणी अपेक्षाच ठेवत नव्हता...; नारायण मूर्तींचा धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2022 10:37 PM2022-09-24T22:37:44+5:302022-09-24T22:38:27+5:30
तेव्हा मनमोहन सिंगांचे सरकार होते. मी तेव्हा २००८ ते २०१२ पर्यंत लंडनच्या एचएसबीसीच्या संचालक मंडळावर होतो. तेव्हा चीनचे नाव दोन ते तीनदा घेतले जायचे, भारताचे फक्त एकदा....
देशाला सर्वात महत्वाची अशी आयटी कंपनी देणाऱ्या इन्फोसिसच्या सह संस्थापक एनआर नारायण मूर्ती यांनी आज देशाबरोबरच आपल्या आयुष्याचा प्रवास कसा झाला हे सांगितले. अहमदाबादमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये ते विद्यार्थी आणि तरुण उद्योजकांना मार्गदर्शन करत होते. यावेळी त्यांनी २००८ चा एक किस्सा सांगितला.
तेव्हा मनमोहन सिंगांचे सरकार होते. मी तेव्हा २००८ ते २०१२ पर्यंत लंडनच्या एचएसबीसीच्या संचालक मंडळावर होतो. एखादी बैठक सुरु झाली किंवा विषय निघाला की तेव्हा चीनचे नाव दोन ते तीनदा घेतले जायचे, भारताचे फक्त एकदा. मी जेव्हा बोर्डावरून बाहेर पडलो तेव्हा क्वचितच भारताचे नाव घेतले जात होते. तर चीनचे नाव २५ ते तीस वेळा घेतले जात होते. या चीनने केवळ ४४ वर्षांत भारताला मागे टाकले. त्या काळात भारतासोबत काय झाले हे आपल्याला माहिती नाही. मनमोहन सिंग हे असामान्य व्यक्तीमत्व होते, माझ्या मनात त्यांच्याविषयी आदर होता. परंतू युपीएच्या काळात देशाचा विकास खुंटला गेला, असे ते म्हणाले.
तो असा काळ होता, की या काळात वेगाने निर्णय घेतले जात नव्हते. प्रत्येक कामात विलंब होऊ लागला होता. याच काळात भारत चीनपेक्षा मागे पडू लागला. यामुळे मला वाटतेय की तुमची पीढी खूप महत्वाचे काम करू शकेल. जिथे जिथे चीनचे नाव येईल तिथे भारताचेही नाव आले पाहिजे, असे काम तुम्ही करायला हवे.
जेव्हा मी तुमच्या वयाचा होतो, तेव्हा माझ्यावर कोणताही जबाबदारी नव्हती. नाही कोणी माझ्याकडून काही अपेक्षा करत होता. भारताचीही तिच परिस्थिती होती. देशाकडूनही जग फारशी अपेक्षा करत नव्हते. पण आज तुम्ही देशाला पुढे न्याल अशी अपेक्षा आहे. मला वाटते की तुम्ही लोक भारताला चीनचा योग्य प्रतिस्पर्धी बनवू शकाल, असे मूर्ती म्हणाले.
जेव्हा मनमोहन सिंग अर्थ मंत्री होते, आणि १९९१ मध्ये देशाच्या आर्थिक क्रांतीला सुरुवात झाली. आता भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारने मेक इन इंडिया आणि स्टार्ट अप इंडियासारख्या योजना सुरु केल्यात, त्यामुळे भारताची प्रतिष्ठा वाढली आहे, असे मूर्ती म्हणाले.
एक काळ होता जेव्हा पाश्चात्य देशांचे लोक भारताकडे नुसते पाहत असत, पण आज त्यांच्या मनात आपल्याबद्दल आदराची भावना निर्माण झाली आहे. भारत आता जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे, असे मूर्ती म्हणाले.