जेव्हा लष्करी अधिकारीच आजाद काश्मिरच्या घोषणा देतो
By admin | Published: August 2, 2016 04:38 PM2016-08-02T16:38:47+5:302016-08-02T16:38:47+5:30
हम क्या चाहते है? आझादी... नारा ए तकबीर, अल्ला हू अकबर या घोषणा काश्मिरमधल्या काझीगुंड भागातल्या वेसू गावात खुद्द लष्कराच्या एका मेजरनेच दिल्याचे वृत्त आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
काझीगुंड (जम्मू व काश्मिर), दि. 2 - हम क्या चाहते है? आझादी... नारा ए तकबीर, अल्ला हू अकबर या घोषणा काश्मिरमधल्या काझीगुंड भागातल्या वेसू गावात खुद्द लष्कराच्या एका मेजरनेच दिल्याचे वृत्त आहे. तरुणांनी खांद्यावर घेतलेला हा मेजर अशा घोषणा देत आहे, या दृष्याचे मोबाईलवर चित्रीकरण केल्याचेही सांगण्यात येत आहे.
काश्मिररीडर.कॉमने दिलेल्या वृत्तानुसार सोमवारी संध्याकाळी हा प्रकार घडला. स्थानिक मशिदीमध्ये संध्याकाळचा नमाज सुरू होता. त्यावेळी काही सैनिकांसह हा मेजर या भागात आला आणि त्याने जमावातल्या काही तरूणांकडे औकाफ कमिटीच्या अध्यक्षाची माहिती विचारली. यावेळी जमावानं या अधिकाऱ्याला व त्याच्यासह असलेल्या सैनिकांना चारी बाजुंनी घेरले. आपण पुरते अडकलो असल्याचे लक्षात येताच, या लष्करी अधिकाऱ्याने आझादीच्या व अल्ला हू अकबरच्या घोषणा सुरू केल्या.
लगेच, त्या तरूणांनी या मेजरला खांद्यावर उचलून घेतले आणि या घोषणा पुन्हा देण्यास सांगितले. जवळपास 20 मिनिटे मेजर आझादीच्या घोषणा देत होत असल्याचे काश्मिररीडरने म्हटलं आहे.
त्यानंतर, तरूणांनी मेजर व त्याच्याबरोबरच्या सैनिकांना सोडून दिलं आणि परत या भागात दिसलात तर परिणाम वाईट होतील असा दम दिला.
नंतर, अनंतनागचे पोलीस अधीक्षक या भागात आले आणि त्यांनी श्रीनगर जम्मू हायवे मोकळा केला. यावेळीही संतप्त तरूणांनी ताबडतोब निघून जा, नाहीतर वाईट परिणाम होतील असा दम पोलीसांना दिला. त्यामुळे पोलीस लगेच निघून गेले.
लष्कराच्या प्रवक्त्यांनी मात्र असा प्रकार घडला नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.