पॅराडाइज पेपर्समध्ये नाव आल्यानंतर भाजपा खासदाने कागदावर लिहून दिली प्रतिक्रिया, धारण केलं मौनव्रत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2017 02:31 PM2017-11-06T14:31:11+5:302017-11-06T14:31:56+5:30
पॅराडाइज पेपर्समध्ये नाव आल्यानंतर बिहारमधील भाजपाचे राज्यसभा खासदार रविंद्र किशोर सिन्हा यांनी कागदावर लिहून आपली प्रतिक्रिया देत, आपलं मौनव्रत असल्याचं सांगितलं आहे.
नवी दिल्ली - पॅराडाइज पेपर्समध्ये नाव आल्यानंतर बिहारमधील भाजपाचे राज्यसभा खासदार रविंद्र किशोर सिन्हा यांनी कागदावर लिहून आपली प्रतिक्रिया देत, आपलं मौनव्रत असल्याचं सांगितलं आहे. एएनआयच्या रिपोर्टरने जेव्हा रविंद्र किशोर सिन्हा यांच्याकडून प्रतिक्रिया मागितली, तेव्हा सिन्हा यांनी रिपोर्टरला इशारा करत पेन मागितलं आणि कागदावर लिहिलं की, 'सात दिवसांसाठी मौनव्रत आहे'. पनामा पेपर्सप्रमाणे लीक झालेल्या पॅराडाइज पेपर्समध्ये भाजपाचे राज्यसभा खासदार रविंद्र किशोर सिन्हा यांचं नाव आहे.
सिन्हा 2014 मध्ये बिहारचे राज्यसभा खासदार म्हणून निवडले गेले. सर्वात श्रीमंत खासदारांमध्ये सिन्हा यांचा समावेश आहे. सिन्हा एक माजी पत्रकार आहे. त्यांनी सेक्युरिटी अॅण्ड इंटेनिजन्स सर्व्हिसेस नावाने एक खासगी सेक्युरिटी कंपनीची (एसआयएस) स्थापना केली आहे. सिन्हा एसआयएस ग्रुपचे प्रमुख आहेत. सिन्हा यांच्या कंपनीचे संबंध आंतरराष्ट्रीय कंपन्यांशीही आहेत. माल्टाच्या नोंदणी विभागातील कागदपत्रांनुसार, एसआयएस एशिया पॅसिफिक होल्डिंग्स लिमिटेड (एसएपीएचएल) 2008 रोजी माल्टामध्ये रजिस्टर झाली आहे. ही एसआयएसची सहकारी कंपनी आहे. रविंद्र किशोर सिन्हा या कंपनीचे छोटेसे शेअरहोल्डर आहेत, तर त्यांची पत्नी रिटा किशोर सिन्हा एसएपीएचएल कंपनीच्या संचालिका आहेत.
#WATCH: BJP MP Ravindra Kishore Sinha's reaction on being asked about a news report of his security firm being linked to 2 offshore entities pic.twitter.com/AryNIJdq8h
— ANI (@ANI) November 6, 2017
पॅराडाइज पेपर्स प्रकरण -
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, 96 नामांकित माध्यम समूहांनी मिळून 'पॅराडाइज पेपर्स'चा खुलासा करण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. पॅराडाइज पेपर्समध्ये 1.34 कोटी दस्तऐवजांचा समावेश आहे. या खुलाशाद्वारे बनावट कंपन्यांबद्दल माहिती समोर आली आहे, ज्याद्वारे जगभरातील श्रीमंत आणि सामर्थ्यशाली मंडळी आपला पैसा परदेशात पाठवण्यासाठी वापर करत होते. 'पॅराडाइज पेपर्स'मध्ये भारतातील 714 जणांचा समावेश आहे. पॅराडाइज पेपर्स लीकमध्ये पनामाप्रमाणे कित्येक भारतीय राजकीय नेते, अभिनेते आणि व्यावसायिकांच्याही नावाचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
तर, यादीमध्ये जगभरातील एकूण 180 देशांच्या नावाचा समावेश आहे. यामध्ये भारत 19व्या क्रमांकावर असल्याची माहिती समोर आली आहे. बर्म्युडामधील 'अॅपलबाय' या कायदेशीर सेवा पुरवणाऱ्या कंपनीची सर्वाधिक कागदपत्रं उघड करण्यात आली आहेत.
जागतिक पातळीवर अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प प्रशासनातील उद्योग मंत्रालयाचे सचिव विलबर रॉस, कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन टुडो यांच्यासाठी निधी संकलन करणाऱ्यांचे नावही या यादीत आहे. याशिवाय ट्विटर आणि फेसबुकमध्ये रशियातील कंपन्यांची गुंतवणूक केल्याचा उल्लेखही या पेपर्समध्ये आहे.
या भारतीयांच्या नावाचा आहे समावेश-
नागरी हवाई राज्यमंत्री जयंत सिन्हा, बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन, विजय माल्या, नीरा राडिया, संजय दत्तची पत्नी मान्यता दत्त यांच्यासारख्या ख्यातनाम मंडळींचा यात समावेश आहे. अमिताभ बच्चन यांचे बर्म्युडामधील एका कंपनीत समभाग असल्याचा धक्कादायक खुलासाही झाला आहे.