तेव्हा 7 दिवसांमध्येच सोडली होती नितीश कुमारांनी मुख्यमंत्रिपदाची खुर्ची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 11:39 PM2017-07-26T23:39:54+5:302017-07-27T05:23:08+5:30

नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप केला.  या राजीनाम्यासोबतच त्यांचा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा चौथा कार्यकाळ संपला.

When Nitish Kumar Resigned as CM of Bihar in seven days | तेव्हा 7 दिवसांमध्येच सोडली होती नितीश कुमारांनी मुख्यमंत्रिपदाची खुर्ची

तेव्हा 7 दिवसांमध्येच सोडली होती नितीश कुमारांनी मुख्यमंत्रिपदाची खुर्ची

Next

पाटणा, दि. 26 - नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप केला.  या राजीनाम्यासोबतच त्यांचा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा चौथा कार्यकाळ संपला. मात्र, यापूर्वीही नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपण्याआधीच राजीनामा दिला आहे. 

सर्वप्रथम मार्च 2000 मध्ये नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यावेळच्या केंद्रातील एनडीए सरकारमध्ये ते कृषीमंत्री होते, त्याच वर्षी 3 मार्च रोजी भाजपाच्या सहकार्याने त्यांनी ‍बिहारमध्ये पहिल्यांदाच सत्ता स्थापन केली होती.  मात्र, त्यावेळी त्यांच्याकडे पुरेसं  संख्याबळ नव्हतं. त्यामुळे अवघ्या सात दिवसातच म्हणजे 10 मार्च 2000 रोजी त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर 2005 मध्ये भाजपासोबत युती करुन त्यांनी मोठा विजय मिळवला होता. त्यासोबतच 24 नोव्हेंबरला पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर ते विराजमान झाले. भाजपासोबतची ही युती काही वर्षे होती, या दरम्यान दुस-या निवडणुकीतही त्यांनी बाजी मारून सरकार स्थापन केलं. मात्र, त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्याआधी भाजपाने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित केल्याने नितीशकुमार नाराज झाले होते. त्यानंतर त्यांनी एनडीएसोबतची युती तोडली होती.

20 महिन्यांतच फुटला महागठबंधनाचा फुगा, भाजपा ठरणार किंगमेकर-

बिहार विधानसभा निवडणुकांनंतर भाजपाला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी राष्ट्रीय जनता दल (राजद), जनता दल यूनायटेड (जदयू)  आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन महागठबंधनचं सरकार स्थापन केलं होतं. 243 सदस्य असलेल्या बिहार विधानसभेत बहुमतासाठी 122 आकडा गाठणं गरजेचं होतं. त्यामुळे 80 जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आलेला लालू प्रसाद यादवांचा राजद, 71 जागा मिळवून दुसरा मोठा पक्ष असलेला नितीश कुमारांचा जदयू आणि 27 जागा मिळवणा-या कॉंग्रेसने एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता. सर्वात मोठा पक्ष असतानाही मुख्यमंत्रीपद आपल्याकडे न ठेवता लालूंनी नितीश कुमारांना मुख्यमंत्री बनवलं आणि आपला मुलगा तेजस्वी यादवा याला त्यांनी उपमुख्यमंत्री बनवलं. महाआघाडी तुटण्याचं जेव्हा-केव्हा वृत्त आलं त्यावेळी लालू प्रसाद यादव यांनी ही चर्चा वायफळ असल्याचे म्हटले होते. महाआघाडी तुटण्याचा प्रश्नच नसल्याचं ते वारंवार म्हणाले होते. 

मात्र,  भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी राजीनामा द्यावा यासाठी नितीश कुमार यांच्यावरील दबाव सातत्याने वाढत होता.  पण, तेजस्वीचा राजीनामा घेण्यास राजद अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी आडकाठी केल्यानंतर नितीश नाराज झाले होते. तेजस्वी यादव यांचा राजीनामा घेण्यात अपयशी ठरत असल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला.  

बिहार विधानसभेत असं बदलू शकतं गणित...
महागठबंधन तुटल्याने नितीश कुमार यांना जर पुन्हा सरकार स्थापन करायचं असेल तर त्यांना भाजपाची मदत घेण्याशिवाय आता पर्याय नाहीये.    243 जागा असलेल्या बिहार विधानसभेत बहुमतासाठी 122 जागा मिळवणं गरजेचं आहे. नितीशकुमार भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत गेल्यास जदयूच्या 71 आणि भाजपाच्या 53 मिळून दोघांच्या 124  जागा होतील. 

बिहार विधानसभेतील पक्षीय बलाबल (एकूण 243 सदस्य)
राष्ट्रीय जनता दल (राजद) – 80
जनता दल यूनायटेड (जदयू) – 71
काँग्रेस – 27
भाजप (विरोधी पक्ष) – 53
सीपीआय – 3
लोक जनशक्ती पार्टी – 2
राष्ट्रीय लोक समता पार्टी – 2
हिंदुस्तानी अवाम मोर्चा – 1
अपक्ष – 4

काय म्हणाले नितीश कुमार राजीनाम्यानंतर- 

मी माझ्याकडून प्रयत्न करून थकलोय. मात्र तेजस्वी यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांचं राष्ट्रीय जनता दलानं स्पष्टीकरणं दिलं नाही. त्यामुळेच मी माझ्या अंतरात्म्याचा आवाज ऐकून राजीनामा दिला आहे. दीड वर्षाच्या काळात आम्ही बिहारच्या जनतेसाठी शक्य तितकं काम केलं. दारूबंदी, पायाभूत विकास तसंच अनेक कल्याणकारी योजना आम्ही बिहारमध्ये सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठी राबवल्या. मात्र, आता परिस्थितीच अशी आली आहे की, माझ्यासाठी काम करणं किंवा आघाडीचं नेतृत्त्व करणं शक्य नाही. त्यामुळे सरकार चालवण्यात किंवा निव्वळ काम करत राहण्यात कोणताही अर्थ उरलेला नाही, असं नितीश कुमार राजीनाम्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. 

  

Web Title: When Nitish Kumar Resigned as CM of Bihar in seven days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.