PM मोदी-मोहन भागवत भेटतात, तेव्हा कोणत्या विषयावर चर्चा करतात?; सुनील आंबेकर म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 14:16 IST2025-03-29T14:16:05+5:302025-03-29T14:16:55+5:30
PM Modi Nagpur Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयातील स्मृती मंदिरालाही भेट देणार आहेत.

PM मोदी-मोहन भागवत भेटतात, तेव्हा कोणत्या विषयावर चर्चा करतात?; सुनील आंबेकर म्हणाले...
PM Modi Nagpur Visit News: पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० मार्च रोजी नागपूर दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यात ते विविध स्थळांना भेटी देणार आहेत. एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत एकाच व्यासपीठावर असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक भागवत ज्यावेळी भेटतात, तेव्हा ते कोणत्या विषयावर चर्चा करतात? याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी माहिती दिली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
टीव्ही९ समिट कार्यक्रमात आजचा भारत काय विचार करतो? या विषयावर त्यांची मुलाखत झाली. यावेळी त्यांना पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक भेटतात तेव्हा कोणत्या विषयांवर चर्चा करतात, याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.
हेही वाचा>> एसपीजीने नागपुरात घेतला पंतप्रधानांच्या सुरक्षेचा आढावा; कडेकोट बंदोबस्त तैनात
अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर म्हणाले, "हे नैसर्गिक आहे की, जेव्हा ते (पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत) भेटतात, तेव्हा देशातील समस्यांवर चर्चा करतात. एक स्वयंसेवक म्हणून संघाचा संदेश असतो की, आम्ही सतत स्वतःला चांगलं बनवत राहिले पाहिजे. आणि देशाला अधिक चांगलं बनवण्यासाठी कष्ट करत राहिले पाहिजे."
"ते (मोदी-भागवत) याबद्दल बोलतात की, संघाकडून सुरू असलेले कार्य आणखी कशा पद्धतीने पुढे घेऊन जाता येईल आणि त्यात आणखी कशी सुधारणा करता येतील. यापलीकडे आणखी ते काय बोलतात हे तेच सांगू शकतात", असे सुनील आंबेकर म्हणाले.
...तर कायद्याने त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करायला हवी
नागपूर हिंसाचाराबद्दल बोलताना सुनील आंबेकर म्हणाले, "मी यापूर्वीच म्हणालो आहे की, आपल्या देशासाठी हिंसाचार चांगला नाही. आम्ही हिंसाचाराचे संमर्थन करत नाही. पण, जर कुणीतरी असे असतील, ज्यांनी मुद्दामहून हे करत असेल, तर मग कायद्याने त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करायला हवी."
पंतप्रधान मोदी स्मृती मंदिराला भेट देणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० मार्च रोजी नागपूरमध्ये असणार आहेत. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयातील स्मृती मंदिराला भेट देणार आहेत. त्याचबरोबर दीक्षाभूमीलाही भेट देणार आहेत. माधव नेत्रालयाच्या विस्तारीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन मोदींच्या हस्ते होणार असून, या कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित असणार आहेत.