पोलीस अधिकाऱ्याला जेव्हा खासदारांनीच सलाम केला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 04:38 AM2019-05-28T04:38:13+5:302019-05-28T04:38:21+5:30
खासदार, आमदार, मंत्र्यांना पाहताच पोलीस कर्मचारी व अधिकारी लगेच त्यांना सलाम ठोकतात.
हैदराबाद : खासदार, आमदार, मंत्र्यांना पाहताच पोलीस कर्मचारी व अधिकारी लगेच त्यांना सलाम ठोकतात. एखाद्या अधिकाºयाने सलाम केला नाही की, लोकप्रतिनिधी चिडतात, हेही सर्वांना माहीत आहे. पण सध्या एक असे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे, ज्यात एक खासदारच पोलीस अधिकाºयाला सलाम करीत आहे. अर्थात त्यामागे कारणही आहे. आंध्र प्रदेशच्या अनंतपूर जिल्ह्यातील एक सर्कल इन्स्पेक्टर गोरंतला माधव यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि हिंदूपूर मतदारसंघातून वायएसआर काँग्रेसतर्फे लोकसभेची निवडणूक लढवली. त्यांनी तेलुगू देसम पक्षाचे क्रिस्ताप्पा निम्माला या विद्यमान खासदाराचा तब्बल १ लाख ४0 हजार मतांनी पराभव केला.जिथे मतमोजणी सुरू होती, तेथून ते विजयानंतर बाहेर पडले, तेव्हा त्यांना गुन्हे अन्वेषण विभागाचे अधीक्षक मेहबूब बाशा दिसले. ते माधव यांचे वरिष्ठ अधिकारी होते. त्यामुळे त्यांना पाहताच माधव यांनी त्यांना पाहून सलाम ठोकला. त्यामुळे बाशा यांनीही एके काळी आपल्या हाताखाली काम करणाºया, पण आता खासदार झालेल्या माधव यांना सलाम केला. सलाम करताना दोघेही हसत होते.
>त्यात गैर काय?
आपण जे केले, ते योग्य होते. मेहबूब बाशा यांना सलाम करण्यात आपणास काहीच गैर वाटले नाही, असे माधव नंतर म्हणाले. मी त्यांचा कायमच आदर करीत आलो आहे आणि यापुढेही करत राहीन, असेही खासदार माधव यांनी सांगितले.